ईडी, सीबीआयला घाबरत नाही

ईडी, सीबीआयला घाबरत नाही

विरार, ता. ४ (बातमीदार) : पालघर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना रंगणार आहे. तर बहुजन विकास आघाडी निर्णायक पक्ष ठरणार आहे. या पक्षाने अजून आपले पत्ते ओपन केले नसल्याने सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना ईडी, सीबीआयने धमकावल्याच्या चर्चा वसई-विरारमध्ये रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी या सगळ्या चर्चांवर पडदा टाकताना, मी ईडी, सीबीआय यांना घाबरत नाही. आमच्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सध्या पूर्ण पालघर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावे घेत असून त्यांची मते आजमावत आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून बविआ येथील निवडणूक लढवत आली आहे. पहिल्या निवडणुकीत त्यांनी आपला उमेदवार बळीराम जाधव यांना निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना तीन निवडणुकीत यश आले नाही. तरी पालघर जिल्ह्यातील त्यांची ताकद मात्र कमी झाली नव्हती. या वेळेला भाजपने ४०० पारचा नारा दिल्याने आणि विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावल्याने पालघरमध्ये सगळ्यात जास्त ताकद असलेल्या बविआचे हितेंद्र ठाकूर यांना ईडी किंवा सीबीआयची भीती दाखवली जात आहे. त्यात बविआने अजून आपला उमेदवार घोषित केला नसल्याचे बोलले जात होते. हितेंद्र ठाकूर तीन दिवस मुंबई बाहेर गेल्याने चर्चांना अजून खतपाणी मिळाले होते.
माझ्यावर कोणत्याही सरकारी यंत्रणांचा दबाव नाही. ईडी, सीबीआय यांनी अजूनही दबाव टाकलेला नाही. मी अशा यंत्रणांना घाबरत नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया होत असेल, तर ते चुकीचे आहे. आमचा छोटा पक्ष आहे. आम्ही आमच्या पद्धतीने विकासाचे काम करत आहोत, असे सांगून ठाकूर यांनी आपला पक्ष पालघर लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले. दोन पक्ष आमच्याविरोधात उभे राहत असतील तर चांगले आहे. आमची मते फिक्स आहेत. या मतदारसंघावर नैसर्गिकरित्या आमचा अधिकार आहे. आमच्याकडे तीन आमदार आहेत, असे वक्तव्य केले. यावरून पालघरमध्ये तिरंगी लढत होणार असे चित्र दिसत आहे.

ईव्हीएमचे संभ्रम दूर करा!
पालघर जिल्हा परिषदेवर सभापती, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता आणि जिल्ह्यातील मोठी महापालिका आमच्याकडे आहे. वाढवण बंदराला विरोध करण्याचे काम बविआने केले आहे. ईव्हीएमवर लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहत असेल, तर ते दूर करण्याचे काम आयोगाने करायला हवे. लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.

बविआचा उमेदवार दोन-तीन दिवसांत
जे कार्यकर्ते उमेदवाराला निवडून आणणार आहे, त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार द्यावे. यामुळे कार्यकर्ते जोमाने काम करतात. मेळाव्यातून त्यांची मते आजमावत आहोत. आता फक्त उमेदवाराचे नाव जाहीर करायचे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत बविआ आपला उमेदवार जाहीर करणार आल्याचे संकेत मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com