उन्‍हाळी शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा

उन्‍हाळी शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा

उन्‍हाळी शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा
हेटवणे धरणाचा फायदा; कीड, अतिवृष्टीपासून संरक्षण
पेण, ता. ४ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे येथील असंख्य शेतकऱ्यांनी उन्हाळी दुबार भातशेती पिकवली असून ती आता हिरवीगार बहरली आहे. उन्हाळ्यातील दुबार भातशेतीला कीड, रोग, पूर, अतिवृष्टीपासून कोणताही धोका नसल्‍याने ती सुरक्षित असल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र वाढत असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर जात आहे. मात्र काही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी दुबार शेती पिकाकडे वळले आहेत. हेटवणे धरणाच्या कालव्यातून अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात असल्याने पूर्व भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाला, वेलवर्गीय अशा विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ‍धरणातील कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत कामार्ली, तळवली, आधारने, सापोली, शेणे, बोरगाव यासह काही खारेपाट भागातील शेतकरी सध्या उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला पिकवत आहेत. तालुक्यातील कृषी विभागाच्या अंतर्गत ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रांपैकी १ हजार ७०० ते १ हजार ८०० हेक्टर भातशेतीची उन्हाळ्यात लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना हेटवणे धरणाच्या कालव्यामुळे उदरनिर्वाहसाठी मोठा आधार मिळत आहे. शिवाय पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील भातशेती जास्त फायद्याची ठरत असल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे पावसाळ्यामध्ये रोगराई, अतिवृष्टी, पूर यांचा सामना शेतकऱ्यांना वेळोवेळी करावा लागत असल्याने अनेकदा भातशेती नापीक होते. मात्र पावसाळ्याऐवजी उन्हाळ्यात दुबार भातशेती मोठ्या प्रमाणात येत असल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.
................................
हेटवणे धरणाचे पाणी शेतीला मिळत असल्याने पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेतीमध्ये चांगले पीक येते. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाल्‍याची लागवड करत असून चांगले पीक घेत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने शेतकरीवर्ग अधिकाधिक पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
-विनोद बामुगडे, प्रगतशील शेतकरी.
..................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com