जिल्हा परिषद शाळेतील मुले हुशार

जिल्हा परिषद शाळेतील मुले हुशार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या की, तुटलेले छप्पर, गळक्या भिंती, अस्वच्छ परिसर असे काहिसे चित्र उभे राहत असे; मात्र आता ही ओळख हळूहळू पुसत चालली आहे. या शाळांना खासगी शाळांप्रमाणे नवा साज मिळू लागला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये खासगी शाळांमधील विद्यार्थीदेखील प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. त्यात नुकतेच किन्हवली येथे रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबाने आपल्या आपल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. मुले हुशार असतानादेखील त्यांची अभ्यासातली प्रगती होत नसल्याने त्यांनी पाल्यांना शेलवली बांगर येथील जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश घेतल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

भगवान वेखंडे शहापूर तालुक्यातील मानेखिंड येथून रोजगारानिमित्ताने किन्हवली गावी राहायला आले. रोजगार उपलब्ध झाल्यावर दोन्ही मुलांना चांगले इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्यावे, अशी सुप्त इच्छा त्यांच्याही मनात निर्माण झाली. त्यांनी दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. त्यासाठी लागणारे डोनेशन आणि दरमहाची भरमसाठ फी भरत राहिले. दोन- तीन वर्षे गेल्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात यायला लागले की, आपली मुले हुशार असूनही त्यांची अभ्यासात फारशी प्रगती दिसत नाही. त्याचवेळी किन्हवलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलवली बांगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेची ख्याती त्यांच्या कानावर गेली. एनएमएमएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या निकालात या शाळेचा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लौकिक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले.

दोन्ही मुलांची चाचणी घेतली असता दोन्ही मुले वाचनात व गणिती क्रियांमध्येदेखील खूपच मागे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बाळू धानके यांनी पालकांच्या लक्षात आणून दिले. दोन्ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल शेलवली बांगर शाळेत सुरू झाली. येथील आदर्श परिपाठ, प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद, गीतमंच, शिक्षण महोत्सव, डिजिटल शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूम, क्रीडा स्पर्धा, योगसाधना, कवायत, तारखेचा पाढा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या उपक्रमात ते रमून गेले.

नवोदय विद्यालय परीक्षेत उत्तीर्ण
२०२२ या वर्षात त्यांचा मोठा मुलगा हर्षल वेखंडे पाचवच्या शिष्यवृत्ती परीक्षा ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत आला. तसेच ३१ मार्च २०२४ रोजी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात त्यांचा लहान मुलगा दुर्वेश भगवान वेखंडे हा उत्तीर्ण झाला. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा असे नवे समीकरण आता दृढ हाऊ लागले आहे. इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com