योजनांचा सुकाळ अन् पाण्याचा दुष्काळ

योजनांचा सुकाळ अन् पाण्याचा दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ ः धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात मार्च महिना उजाडताच पाणीटंचाई डोके वर काढले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११६ हून अधिक गाव-पाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाने जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. विशेषतः जिल्ह्यातील महानगरांची तहान भागविणारा शहापूर सर्वाधिक तहानलेला तालुका म्हणून सध्या होरपळत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत ९७ गावे आणि २८९ पाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता; तर ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १३५ गावे आणि ३४५ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहिरीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात; पण विविधा योजना राबवून आणि कोट्यवधी रुपयांचा निधीखर्च करूनही टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे.

ठाणे जिल्ह्यातील पहिला टँकर शहापूर तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. सध्या फुगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड; तर नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी ११६ गावपाड्यांत २८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. कल्याण, अंबरनाथ ग्रामीण परिसरातही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
--
रायगडमध्ये २० हजार नागरिकांना टंचाईच्या झळा
अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण व पनवेल या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार या तीन तालुक्यांतील ५३ ठिकाणी १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० गावे व ४३ वाड्यांचा समावेश आहे. साधारण २० हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलजीवनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या १,४४४ नळपाणी योजनांमुळे जिल्ह्यात पाणीटंचाई कमी होईल, असे सांगितले जात होते; मात्र तसे काहीही झालेले नाही.
--
पालघरमध्ये ४८७ टँकरच्या फेऱ्या
पालघर ः जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा व वसई या ४ तालुक्यांत ऐन मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. मोखाड्यातील ७ गावे ३५ पाड्यात, जव्हारमध्ये एक गाव ८ पाड्यात, तर वाडा येथे २ गावे व ३५ पाड्यांना ४८७ टँकरच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत; तर पालघर ग्रामीण भागातील १० गावे व ४७ पाड्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. वसई तालुक्यातील महापालिकेकडून प्रतिदिन एकूण ८ टँकरने २३ फेऱ्या पाणी उपलब्ध करण्यात आले. मात्र हे पाणीदेखील पुरेसे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एप्रिल व मे या २ महिन्यांत पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com