बाटली कंटेनरमधून रोपट्यांसाठी पाण्याची सोय

बाटली कंटेनरमधून रोपट्यांसाठी पाण्याची सोय

Published on

वसई, ता. १० (बातमीदार) : उष्णतेचा पारा अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे माणसाच्या अंगाची लाही लाही होत आहे. अशातच वृक्षांनादेखील वाढत्या तापमानाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यांना वेळेत पाणी मिळावे, म्हणून बाटली कंटेनर तयार करून त्यांना मुबलक पाणी दिले जात आहे. यासाठी वसईतील नागरिकांचादेखील हातभार लागत आहे.

नन्हे हाथ फाऊंडेशनचे संस्थापक संजय वैष्णव आणि संस्थेच्या अन्य सदस्यांनी काही वर्षांपासून या उपक्रमाला चालना दिली आहे. सध्या उष्णता अधिक असल्याने वृक्ष सुकून जातील, त्यांची वाढ होणार नाही, हे लक्षात घेत वसई पश्चिमेला रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी मिळावे, यासाठी टाकाऊ असणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. प्लास्टिक बाटलीचे कंटेनर तयार करून एक छोटा पाईप मुळापर्यंत जाईल, अशाप्रकारे लावण्यात आला आहे. सकाळी पाणी बाटलीत भरले जाते आणि हळूहळू रोपांच्या मुळापर्यंत जात असल्याने जमिनीत ओलावा टिकण्यास मदत होते. तसेच उष्णतेपासून झाडांचा बचाव होण्यास मदत मिळते.

वृक्ष हे सजीवांसाठी प्राणवायू देणारे आहेत. शहरात सिमेंट- काँक्रीटीकरणाचे जंगल वाढत असताना वसई-विरार महापालिका, तसेच समाजसेवी संस्था वृक्षारोपण करत परिसर अधिकाधिक हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच या रोपांचे संगोपन व्हावे, म्हणून उन्हाळ्यात आखलेल्या उपक्रमाला नागरिकांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

ओलावा टिकून राहण्यास मदत
जमिनीतील पाणी सुकल्याने झाडांच्या मुळांना वरून पाणी द्यावे लागते, अन्यथा झाडे सुकून जातात. उन्हाळ्यात झाडांवर किडीचे प्रमाण जरी कमी असले, तरी उन्हामुळे पाने कोमेजून जातात. यासाठी घरातील किंवा बाहेरील झाडांना आळी करून त्यामध्ये पालापाचोळ्याचे अच्छादन केले पाहिजे. यामुळे झाडाभोवती ओलावा टिकून राहतो. घरामध्ये कुंडीमधील झाडे असतील, तर या कुंड्या उन्हाळ्यात सावलीत ठेवाव्यात. त्यांना नियमितपणे पाणी दिल्यामुळे झाडाचे आरोग्य चांगले राहते.

उन्हाळ्यात झाडांची काळजी घ्यावी
- रोपे वाढवण्यासाठी मातीची हलक्या रंगाची भांडी वापरावीत. प्लास्टिकची भांडी वापरणे टाळा, कारण ती झाडांना हानी पोहोचवू शकतात.
- कडक उन्हामुळे माती कोरडी पडू लागते. जमिनीत गांडूळ खत, कोकोपीट आदी पाणी साठविणारे अधिक साहित्य घाला. झाडांना अधिक खोलवर पाणी द्या.
- कुंडीतील झाडांना उन्हाळ्यात जास्त पाणी द्यावे लागते. सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक वेळी झाडांना पाणी द्या, जेणेकरून माती ओलसर राहील.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा झाडांच्या फांद्या आणि पानांवर पाणी शिंपडावे, जेणेकरून झाडे हिरवीगार आणि निरोगी राहतील.
- माती आणि रोपांची मुळे थंड ठेवण्यासाठी पालापाचोळा वापरू शकता. पालापाचोळा झाडांच्या भोवती ठेवून झाडे आणि मातीमध्ये ओलावा ठेवतो.
- अति उष्णतेच्या प्रभावापासून या वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, घरातील बागेत जाळीदार कापडाच्या साहाय्याने झाडांना सावली देऊ शकतो.

पर्यावरणाचा समतोल प्रदूषणामुळे ढासळत असताना वृक्ष आपल्याला प्राणवायू मुबलक देत असतो. त्यामुळे झाडे लावणे हा आनंद आहे, मात्र त्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात झाडांची काळजी न घेतल्याने ती मरतात. त्यामुळे बाटलीतून पाणी येण्याची संकल्पना खूप स्तुत्य आहे.
- दीपक नाईक, पर्यावरणप्रेमी, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com