Do Aur Do Pyaar Review
Do Aur Do Pyaar ReviewESAKAL

Do Aur Do Pyaar Review: पती-पत्नीच्या नात्‍यामधील गुंतागुंतीवर बेतलेली कथा; कसा आहे 'दो और दो प्यार'?

Do Aur Do Pyaar Review: लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कोणत्या समस्या उद्‍भवतात, त्यांच्यातील प्रेमाची भावना नेमकी कशी असते, त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो की काळानुरूप कमी कमी होत जातो या गोष्‍टींवर 'दो और दो प्यार' या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे.

हिंदी चित्रपट- दो और दो प्यार
संतोष भिंगार्डे

Do Aur Do Pyaar Review: आपल्‍या अभिनयाच्या जोरावर विद्या बालन (Vidya Balan) हिने अनेक चित्रपट यशस्वी केले आहेत. आता तिने ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केले आहे. तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कोणत्या समस्या उद्‍भवतात, त्यांच्यातील प्रेमाची भावना नेमकी कशी असते, त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो की काळानुरूप कमी कमी होत जातो या गोष्‍टींवर या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. पती-पत्नीमधील अजब नाते आणि गुंतागुंतीवर बेतलेला हा चिटपट आहे.

काव्या (विद्या बालन) आणि अनिरुद्ध (प्रतीक गांधी) हे पती-पत्नी असतात. काव्याने आपल्या कुटुंबीयांविरोधात जाऊन लग्न केलेले असते. काव्या ही पेशाने डेन्टिस्ट असते; तर अनिरुद्ध बिझनेसमन असतो. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो हा बिझनेस सांभाळत असतो. दोघांच्या लग्नाला बारा-तेरा वर्षे झालेली असतात. त्यांच्यामध्ये भांडण वा तंटा वगैरे काही नसतो; परंतु त्यांच्या नात्यामध्ये पहिल्यासारखा गोडवा नसतो. कारण दोघांचे बाहेर विवाहबाह्य संबंध असतात.


अनिरुद्धचे अभिनेत्री बनण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नोरा (इलियाना डिक्रूझ)बरोबर प्रेमाचे संबंध असतात; तर काव्या फोटोग्राफर विक्रम (सेंथिल राममूर्ती)च्या प्रेमात पडलेली असते. त्यामुळे काव्या आणि अनिरुद्ध यांना आपल्यातील नाते संपवायचे असते; परंतु ते एकमेकाला सांगू शकत नाहीत. अशातच काव्याच्या माहेरी एकाचा मृत्यू होतो. अंत्यसंस्कारासाठी काव्या एकटीच निघालेली असते. मग अनिरुद्धही तिच्याबरोबर जाण्यास निघतो आणि दोघेही उटीला अर्थात काव्याच्या घरी जातात. मग त्यानंतर त्यांच्यातील नाते पुन्हा बहरते का, त्यांच्या नात्यामध्ये गोडवा पुन्हा निर्माण होतो का, ते दोघेही आपापल्या प्रेमसंबंधाची कबुली देतात का, त्यानंतर पुढे काय घडते, वगैरे प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील.


शीर्षा गुहा ठाकूरता यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी पती-पत्नीमधील प्रेम, त्यांच्या नात्यातील रुसवे-फुगवे चित्रपटामध्ये मांडलेले आहेत. या हलक्या-फुलक्या कथेला त्यांनी विनोदाची झालर उत्तम चढवली आहे. अभिनेत्री विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ, सेंथिल राममूर्ती आदी कलाकारांनी आपापल्या अभिनयाने या कथेला उत्तम साज चढविला आहे. विशेष बाब म्हणजे विद्या बालनने संपूर्ण चित्रपट जणू काही आपल्याच खांद्यावर घेतलेला आहे.

काव्याच्या भूमिकेला विविध छटा आहेत आणि विद्याने ही भूमिका समरसून साकारली आहे. प्रतीक गांधीनेही कमालीचा अभिनय केला आहे. आपली पत्नी आणि प्रेयसी यांच्यातील नाते जपताना त्याची होणारी घालमेल तसेच मनाची द्विधा अवस्था दर्शवणारे विविध भाव पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटले आहेत. शिवाय या चित्रपटात वडील आणि मुलीचे नातेही सुंदरपणे दाखविण्यात आले आहे. सेंथिलने एका फोटोग्राफरची भूमिका उत्तमरीत्या वठविली आहे. इलियाना पडद्यावर सुंदर दिसली आहे. चित्रपटातील संवाद मजेशीर आणि हलके-फुलके आहेत. तसेच चित्रपटातील पार्श्वसंगीत दमदार झालेले आहे.


सिनेमॅटोग्राफर कार्तिक विजयने उटी वगैरे ठिकाणची दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. परंतु चित्रपटाची गती अतिशय संथ आहे. पूर्वार्धात चित्रपटाची कथा फारशी वेग घेत नाही. त्यामुळे मनामध्ये उत्सुकता निर्माण होत नाही. तसेच संगीतही फारसे आकर्षक झाले आहे, असे म्हणता येणार नाही.

दोन स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com