प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

नवी मुंबईत ४४ किलो प्लास्टिक जप्त
महापालिकेची आठ प्रभागांत धडक मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ ः ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत ‘थ्री आर’ संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून प्लास्टिक पिशव्या व एकल प्लास्टिकचा वापर थांबविण्याबाबत जनजागृती करण्याप्रमाणेच ठिकठिकाणी तपासणी करून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अनेक व्यावसायिक व आस्थापना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी व कापडी पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास आले. मात्र या मोहिमेच्या तपासणीत एकल वापर प्लास्टिक आढळलेल्या २२ व्यावसायिक आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करत एक लाख १० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच एकूण ४४ किलो ५५० ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत २२ व २३ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात मार्केट्स, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके, वाणिज्य संकुले, मार्ट, पथविक्रेते, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या. २२ एप्रिलला बेलापूर विभागात दोन दुकानांची तपासणी केली असता, १२ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने ते जप्त करण्यात आले. प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे १० हजार दंड वसूल करण्यात आला. नेरूळ विभागामध्ये एका व्यावसायिकाकडून अडीच किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करत पाच हजार दंडात्मक वसुली करण्यात आली. त्‍यानंतर वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा विभागात दंडात्‍मक करवाई करून प्लास्टिक जप्त करण्यात आले. परिमंडळ दोन विभागाच्या भरारी पथकानेही एका व्यावसायिकाकडून अर्धा किलो प्लास्टिक जप्‍त करत पाच हजार रुपये दंड वसूल केला. अशाप्रकारे २२ एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधात्मक प्लास्टिक तपासणी धडक मोहिमेत एकूण १३ दुकानांवर कारवाई करून एकूण २९.५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. तसेच एकूण ६५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसुली करण्यात आली. अशाच प्रकारे २३ एप्रिल रोजी देखील बेलापूर, वाशी, तुर्भे, ऐरोली विभागात कारवाई करून नऊ दुकानांतून एकूण १५ किलो ५० ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. तसेच एकूण ४५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. अशाप्रकारे २२ व २३ एप्रिल या दोन दिवसांत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com