विविध करांमध्ये बदल झालेच पाहिजे

विविध करांमध्ये बदल झालेच पाहिजे

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २५ : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना अग्निशमन यंत्रणा सक्षम करणे महत्त्वाचे झाले आहे. देशात फायर परवानगीसाठी एकच नियम असावा. याचबरोबर जीएसटी, वाहतूक यंत्रणा, उत्पन्न कर यांसह अन्य करात बदल झाले पाहिजेत. जेणेकरून याचा फायदा देशभरात होईल. व्यावसायिकांसह सर्वसामान्यांनाही याचा दिलासा मिळेल, अशा अपेक्षा व्यावसायिक यानिमित्त व्यक्त करत आहेत.
आगीच्या दुर्घटना घडत असतात. त्यामुळे मालमत्ता, जीविताला धोका पोहचत असतो. अग्निशमन यंत्रणा असली, तरी प्रसंगाच्या वेळी त्वरित त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, औद्योगिक वसाहत; तसेच गृहसंकुल आदी ठिकाणी प्रशिक्षण घेणारे व्यक्ती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षणार्थींकडून दुर्घटना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि मोठ्या प्रमाणात होणारी हानी टाळता येईल. सरकारकडून नियम असावेत; तसेच उत्पन्न कमी व वाढते कर पाहता यात याचा व्यवसायावर परिणाम होत असतो. तसेच जिल्ह्यात वाहतूक यंत्रणा सक्षम नाही. सुसज्ज, पर्यायी मार्ग नसल्याने कच्चा, पक्का माल नेण्यासाठी येणारा खर्च अधिक असतो. त्यामुळे या खर्चाचा भार ग्राहकांपर्यंत होतो. या साऱ्या मुद्द्यांवर अंमलबजावणी व्हावी आणि समस्यांचे निराकरण झाल्यास व्यावसायिक व जनतेला निश्चितच फायदा होईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
---------------------
गॅस, पाणी, विजेला आपण प्राधान्य देतो. तसेच व्यावसायिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. त्यामुळे यात सुधारणा झाली पाहिजे. वाहतुकीवर पडणारा भर पाहता किमतीवर परिणाम होतो. त्यामुळे या किमती कमी झाल्या पाहिजे. सुसज्ज रस्ते झाले, तर येणारा माल लवकर पोहचेल. त्यामुळे इंधन, पैसे वाचतील आणि आम्हालाही फायदा होईल. परिणामी, ग्राहकांना चांगली आणि स्वस्त दरात सेवा देऊ शकतो. आगामी सरकारने वाहतूक व्यवस्था, मालावरील किमतीत नियंत्रण ठेवावे, हीच अपेक्षा आहे.
- प्रताप पुजारी, व्यावसायिक

कराचा बोजा अधिक होत आहे. जीएसटीचा करही वेगवेगळा आहे. आयकरही वाढत आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक वर्गाचे उत्पन्न कमी आणि कर जास्त असा विरोधाभास पाहावयास मिळत आहे. नव्या सरकारने करावर सूट दिली पाहिजे. सरकारचे महसुली उत्पन्नवाढीस व्यावसायिक मदत करतो. त्यामुळे हा विचार करणे गजरेचे आहे. जेणेकरून व्यवसायाला चालना मिळेल आणि करापासून दिलासा प्राप्त होईल.
- रामू वर्मा, व्यावसायिक
-------------------
आगींच्या बाबतीत नियम हे सर्व राज्यांत एकच असले पाहिजेत. जेणेकरून परवानगी घेण्यास एजन्सीला अडचण होणार नाही. नियमांची परिपूर्तता झाली पाहिजे. नागरिकांच्या जीवाची आणि मालमत्तेची त्यामुळे सुरक्षितता निर्माण होईल. शाळेत शिक्षक, व्यवस्थापन मंडळ आणि विद्यार्थ्यांना; तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फायर प्रशिक्षण देण्यात यावे. याचबरोबर अनेकदा मोठ्या गृहप्रकल्पाला आगीची झळ पोहचत असते. त्यामुळे अशा सोसायट्यांमध्ये फायर प्रशिक्षण एका सदस्याला तरी असावे; जेणेकरून दुर्घटना घडल्यास आगीवर नियंत्रण मिळवताना फायदा होईल. प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला सोसायटीने ठराविक मानधन निश्चित करावे. याबाबत नवे नियम लागू केले पाहिजेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला नवे कवच तयार होईल. ही आगामी सरकारकडून अपेक्षा आहे.
- संकेत जाधव, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com