मुख्यमंत्र्यांच्या सही अभावी रखडल्या एसटीच्या २२०० नव्या बसेस

मुख्यमंत्र्यांच्या सही अभावी रखडल्या एसटीच्या २२०० नव्या बसेस

एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप, ऐन हंगामात उत्पन्न बुडाले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : एसटी महामंडळ बस खरेदी निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने महामंडळाला मिळणाऱ्या २,२०० गाड्या रखडल्या आहेत. त्याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवाशांना बसत आहे. फाईल वेळेवर पाठवूनसुद्धा सही न करण्यामागे काही अर्थकारण आहे का, अशी शंका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप हेसुद्धा उपस्थित होते.
श्रीरंग बरगे म्हणाले की, एसटीच्या जवळपास १० हजार बस मोडकळीस आल्या असून त्यांच्या दुरुस्तीचे काम करून यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. त्याचबरोबर जुन्या गाड्यांचा त्रास चालकांनाही होतो. महामंडळाने अशोक लेलँड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार २,२०० बसची निविदा मंजूर केलेली आहे; पण त्यासाठी लागणारा निधी मात्र सरकारकडून आलेला नाही. वर्कऑर्डर दिल्याशिवाय गाड्या ताब्यात येऊ शकणार नाहीत आणि निधी प्राप्त झाल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही. कारण सरकारकडून बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नसल्यामुळे विनाकारण पुरवठादार व महामंडळ यांच्यात संघर्ष उभा राहतो.
यापूर्वी अशी प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर त्याचा वाईट परिणाम महामंडळाच्या एकंदर आर्थिक स्थितीवर होतो, त्यावेळी मात्र सरकारी अधिकारी हात झटकून मोकळे होतात.
---
बस खरेदी प्रकरणात आचारसंहिता लागू होण्याअगोदर मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी फाईल त्यांच्याकडे पाठवूनसुद्धा त्यावर सही झाली नाही. निविदा मंजूर करण्यात आलेल्या कंपनीने संपर्क साधावा, यासाठीच या फाईलवर सही करण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.
----
निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन तिढा सोडवा
वर्कऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी गाड्या मंडळाकडे येणार आहेत तोपर्यंत शाळा, कॉलेजच्या सुट्या व जत्रा हंगाम संपणार आहे. त्यामुळे ऐन हंगामात महामंडळाचे उत्पन्न बुडणार आहे. त्यामुळे यातून तत्काळ योग्य मार्ग काढून प्रसंगी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन तिढा सोडवण्यासाठी महामंडळाला निधी प्राप्त करून द्यावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com