महिलांसाठी असलेली विशेष तेजस्विनी बस सुरू करा

महिलांसाठी असलेली विशेष तेजस्विनी बस सुरू करा

महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस सुरू करण्याची मागणी
तुर्भे (बातमीदार) : तेजस्विनी बससेवा सुरू करून महिला प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी एक निवेदन देऊन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. साधारणतः पाच वर्षांपूर्वी महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्‍या. त्यानंतर काहीकाळ महिलांसाठी या बसमधून सेवा देण्यात आली. मात्र, त्यानंतर बस गायब झाल्या. त्या आता पाहायला मिळत नाहीत. २०११च्या जनगणेनुसार पाच लक्षहून अधिक महिला लोकसंख्या नवी मुंबई शहरात असून अधिकतर व्यवसाय, नोकरी यासाठी शहरातील विविध भागात प्रवास करतात. त्‍यामुळे महिलांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, महिला सक्षमीकरण व्हावे, यासाठी राज्य सरकारने तेजस्विनी बस योजनेंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमासाठी दहा बस मंजूर केल्या होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०१९ रोजी या बस उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट केल्या होत्या. मात्र, सध्या या बसची सेवा बंद असल्‍याने त्‍या पुन्‍हा सुरू करण्यात याव्‍यात, असे निवेदनात म्हटले आहे.
........................
अपघातमुक्त नवी मुंबईसाठी पालकांना वाहतूक नियमांचे धडे
नेरूळ (बातमीदार) : कोपरखैरणे वाहतूक पोलिस शाखेतर्फे सेंट मेरी स्कूलमध्ये पालकांची बैठक घेऊन त्यांच्‍या वाहतुकीबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना वाहतूक विभागातर्फे कशी मदत करता येईल, वाहतूक कोंडीचा प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल, याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला कोपरखैरणे परिसरातील शेकडो पालकांनी हजेरी लावली होती.
वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने कोपरखैरणे वाहतूक शाखेने नुकतेच सेंट मेरी स्कूलमध्ये पालकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी पालकांमध्ये वाहतुकीबाबत असलेल्या सर्व समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक समस्येवर विभागातर्फे कशी मदत करता येईल आणि वाहतुकीचा प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबत वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नवी मुंबई अपघातमुक्त कशी करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे वाहनावर असणारा थकीत दंड कुठे व कसा भरावा, याबाबतदेखील सांगण्यात आले. त्यामुळे अनेक पालकांनी यावेळी तत्‍काळ आपल्या वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम भरली. या बैठकीला पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
........................
ऐरोलीतील दूषित पाण्याच्‍या नमुन्याची होणार तपासणी
तुर्भे (बातमीदार) : नवी मुंबईतील औद्योगिक कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीकिनारी मासे मृत पडत असल्‍याच्‍या घटना घडत आहेत. त्‍यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून त्‍याची तपासणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जी. एस. पाटील यांनी महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली होती. त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली. तसेच येथील पाण्याचे नमुने घेतले. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, सचिन अदकर, शशिकांत पाटील, तसेच ग्रामस्थ दीनानाथ पाटील व अन्य ग्रामस्थ हजर होते. पाण्याची तपासणी करून मासे कसे मृत पावले, याचा निष्कर्ष काढला जाईल, असे यावेळी उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी सांगितले. तसेच तलावात गणपती आणि देवी मूर्ती विसर्जित होत असल्याने याबाबतीतसुद्धा तपासणी केली जाईल, असे सांगण्यात आले.
.................
चाणक्य परिसरात सागरकिनाऱ्याची स्वच्छता
नेरूळ (बातमीदार) : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आले. त्या अनुषंगाने टी. एस. चाणक्य महाविद्यालयामागील परिसरातील सागरीकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील टी. एस. चाणक्य येथील सागरकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी व टी. एस. चाणक्याचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानअंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश अशा पंचमहाभूतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची माहिती देण्यात आली. तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिकरीत्या शपथ घेण्यात आली.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com