ठाण्यात आचारसंहिता भंगाचे ५ गुन्हे दाखल

ठाण्यात आचारसंहिता भंगाचे ५ गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करीत सी-व्हीजल ॲपची निमिती केली आहे. या ॲपवर आलेल्या तक्रारींपैकी चार तक्रारींची तर, एक ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी गुरुवारी (ता.२५) दिली.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदार संघ वगळता कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात ५ व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. असे असले तरी, ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्या उमेदवारांकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी व्हिजील या मोबाईल ॲपचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून तक्रार नोंदवता येते. त्यानुसार सी - व्हीजील ॲपवर आतापर्यंत ४१७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३४४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून ४ तक्रारींच्या पडताळणीत आचारसंहिता भंग केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, ऑफलाईन पद्धतीने १५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर, एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
.............
२ लाख ३९ हजार मतदारांची वाढ
ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवल्यामुळे मतदार नोंदणीत अवघ्या चार महिन्यांत २ लाख ३९ हजार ८८४ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६६ लाख ३२ हजार ४०४ वर पोहोचली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३५ लाख ७२ हजार ७३९ तर, स्त्री मतदारांची संख्या ३० लाख ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. दुसरीकडे १८-१९ वयोगटातील मतदारांच्या संख्येत देखील ३१ हजार ३१० ने वाढ झाल्याने तरुण मतदारांची संख्या थेट १ लाख १ हजार ३० वर पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com