नवदाम्प‍त्यांनी घेतले मतदानाचे ‘वचन’

नवदाम्प‍त्यांनी घेतले मतदानाचे ‘वचन’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : विवाहबंधनाची गाठ बांधत असताना लोकशाहीने दिलेला हक्क आणि कर्तव्य विसरणार नाही. आम्ही मतदान करणारच, असे वचन नवदाम्प‍त्यांनी ठाण्यात घेतले. निमित्त होते ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात नवदाम्प‍त्यांच्या लग्नाच्या नोंदणीचे. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने येथे सकाळपासूनच नोंदणी विवाहाचा धडाका सुरू होता. विधीनुसार सप्तपदी किंवा सात वचने येथे नव्हती; पण मतदान करण्याचे वचन मात्र त्यांनी यावेळी घेतले.
सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात मतदान जनजागृती करण्यात आली. दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. या वेळी विवाह नोंदणी करण्यासाठी नववधू-वर आणि वऱ्हाडी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यात रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. याचेच औचित्य साधून स्वीप टीमने दुय्यम निबंधक कार्यालयात सहायक निवडणूक अधिकारी ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुय्यम निबंधक यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला होता. विवाह नोंदणी करण्यासाठी ठाणे शहरातील नववधू-वर व वऱ्हाडी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्या सर्वांना मतदान टक्केवारी कशी वाढेल, याविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव त्यांना करून दिली.

वऱ्हाडींना आवाहन
१. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा.
२. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्व‍ल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी.
३. आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाइकांना, परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे.
४. सर्वांनी न चुकता दिनांक २० मे रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
५. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या सर्व वऱ्हाडींकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले.

नवीन घरात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि ठाणे शहरातील सजग मतदार म्हणून मतदान करेल. नागरिकांनीही लोकशाही उत्सवात सहभाग घेत मतदान करावे.
- समीक्षा मंचेकर, नववधू

देशाप्रती कर्तव्य
संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहे, असे नवीनच लग्न झालेले हर्षद सावंत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com