अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी (ता. २८) रात्री उशीरा सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रदीप पाटील हे १९९५ पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून, माजी विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली; मात्र आता मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यां‍नी या वेळी सांगितले. पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशीष डुबली, ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


नाराजी भोवणार?
कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षात धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसला जागा न मिळाल्याने नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास असहकार्याच्या भूमिकेत आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचा फायदा विरोधी पक्ष उचलत असून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com