डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?

डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : डोंबिवली पूर्वेतील उष्मा पेट्रोलपंपाजवळ असलेल्या झाडांच्या मुळाशी सफेद रंगाचा पावडरसदृश चुरा टाकण्यात आला आहे. ही झाडे पूर्णतः सुकली असून या पावडरसदृश पदार्थामुळे ही झाडे सुकल्याचा पर्यावरणप्रेमींनी आरोप केला आहे. झाडे मारण्यासाठी हा प्रकार अज्ञातांकडून खुलेआम सुरू असून याकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही का? झाडे कापल्यावर गुन्हा दाखल होतो; परंतु जिवंत झाडे असे घातक पदार्थ वापरून मारली जात आहेत, याकडे कोणी गांभीर्याने पाहत नसल्याने अनेक वृक्षांची कत्तल अशा पद्धतीने शहरात सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून झाडांच्या मुळाशी सफेद रंगाचा पावडरसदृश चुरा टाकण्यात येत आहे. मानपाडा रोड, एमआयडीसी परिसरातील झाडांच्या मुळाशी चुरा टाकण्याचे असे प्रकार घडले आहेत. महिन्याभरापासून शहरात प्रचंड उकाडा वाढला आहे. उन्हाच्या या कडक झळांनी झाडे कोमेजून गेली आहेत. या दिवसांत पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे अर्धमेली झालेली असतात. त्यातच या पावडरसदृश पदार्थामुळे झाडांची खोड सुकली आहेत. झाडे मारण्यासाठी ही पावडर खोडांशी टाकली जात असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले आहे.

कल्याण-शीळ रोड तसेच बदलापूर पाईपलाईन मार्ग याठिकाणी असेच प्रयोग करून अनेक झाडांची कत्तल यापूर्वी केल्याचे वृक्षप्रेमी सांगतात. डोंबिवली पूर्वेतील उष्मा पेट्रोलपंपाजवळ असलेल्या पाच ते सहा जुन्या वृक्षांच्या खोडाभोवती अशी पावडर टाकलेली आहे. ही पावडर कोणी, कशासाठी टाकली आहे, याची माहिती आजूबाजूला कोणालाच नाही. त्यामुळे याची तपासणी व्हावी, असे प्रकार वृक्षांची कत्तल करण्यासाठी केले जात असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत.

झाडे तोडावयाची असल्यास त्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावून पालिकेकडून रीतसर परवानगी घेतली जाते; मात्र जुन्या वृक्षांची कत्तल होत असताना त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. अनेकदा झाड तोडण्याची परवानगी मिळाली नाही की त्यावर काही प्रयोग करून ते मारले जातात. एखाद्या परिसरातील पाच ते सहा झाडे अचानक कशी सुकून गेली. याची पालिका प्रशासनाला माहितीदेखील नसावी.

पावडरच्या नमुन्यांची तपासणी
पावडरचे नमुने घेण्यात आलेले आहे. त्याची तपासणी व परीक्षण करून नक्की ते काय आहे, याची माहिती घेतली जाईल. आजूबाजूला चौकशी केली असता एक व्यक्ती किड्या- मुंग्यांना खाण्यासाठी तेथे पीठ टाकत असल्याचे सांगितले आहे; परंतु त्याला तसा वास येत नसल्याने याची पूर्ण शहानिशा करू, असे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.


शहरात विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांचे सिमेंट- काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यंदा उन्हाळ्यात पारा हा ४३ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला आहे. सिमेंटचे रस्ते उन्हाच्या वाफा मारतात. जुन्या विस्तीर्ण झाडांमुळे काही प्रमाणात का होईना थंडावा निर्माण होतो; मात्र या झाडांची अशी कत्तल होत राहिली तर पर्यावरणास धोका निर्माण होईल. परिणामी, त्याचा नागरिकांना त्रास होईल.
- नितीन देसाई, वृक्षप्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com