कालचे प्रतिस्पर्धी आजचे सोबती

कालचे प्रतिस्पर्धी आजचे सोबती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचे ताजे उदाहरण म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघातील बदललेले चित्र. या मतदारसंघात आतापर्यंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंद परांजपे, राजू पाटील हे तीन उमेदवार कट्टर प्रतिस्पर्धी होते. ते आता महायुतीच्या गठबंधनात सोबती झाले आहे. त्यापैकी दोन सोबतींनी आपली संपूर्ण ताकद आपल्या नव्या मित्राच्या विजयासाठी लावलेली दिसत आहे. त्यामुळे यंदाची कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या कारणानेही चर्चेचा विषय ठरला आहे.
वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यासह लोकसभा निवडणुकीचे वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. यंदा राजकीय पक्षांचे समीकरण पूर्णपणे बदलल्यामुुळे वातावरणही ढवळून निघाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी म्हणायचे, तर येथे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना रंगणार आहे. कालपर्यंत एकत्रित खांद्याला खांदा लावून आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकत्यांमध्ये दुफळी तयार झाली आहे. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण आता हा अस्तित्वाचा मुद्दा चर्चेचा विषय नवीन गठबंधनाचा झाला आहे.

२००९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ बनल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आनंद परांजपे खासदार म्हणून निवडून आले. त्या वेळी शिवसेना-भाजप अशी युती होती. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरेंचा या निवडणुकीत पराभव झाला. ठाकरे गटातून निवडणूक लढवणाऱ्या वैशाली दरेकर त्या वेळी मनसेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यांनाही लाखभर मते या निवडणुकीत मिळाली होती. पण, मधल्या काळात आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राजकारणात नवखे असलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांना उतरवले. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र असल्याने शिवसेनेने संपूर्ण ताकद त्यांच्या विजयासाठी लावली.
२०१४ मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे प्रमोद ऊर्फ राजू पाटील हे तिघेही प्रतिस्पर्धी होते. मोठमोठ्या सभा घेत एकमेकांच्या घरातील खासगी गोष्टी या वेळी प्रचारात चव्हाट्यावर आणल्या. या निवडणुकीत डॉ. शिंदे यांचा विजय झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परांजपे ठाण्यातून उभे राहिले. तर राजू पाटील रिंगणात उतरले नाहीत. ठरल्याप्रमाणे त्यांना निर्विवाद आमदारकी मिळाली असे म्हणतात. पण २०१४ मध्ये डॉ. शिंदे यांचा विजय परांजपे आणि पाटील या दोघांच्याही जिव्हारी लागला होता. म्हणूनच त्यानंतर त्या दोघांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही.

वादावर पडदा पडला
विकासकामांच्या श्रेयवादावरून मनसेचे राजू पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात वाद होते. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे पाटीलही आता ‘कामाला’ लागले आहेत. अगदी महायुतीत अजित पवार गट असतानाही बारामतीच्या जागेवरून आनंद परांजपे यांनी उघड नाराजी व्यक्त करत कल्याणमध्ये धडा शिकवण्याची भाषा केली होती. आता हे सर्व वाद व कटूता बाजूला सारून परांजपे व पाटील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यासाठी कामाला लागले आहेत.

मनोमिलनाची प्रतीक्षा
एका निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अजित पवार गटाचे आनंद परांजपे आणि आमदार पाटील आता सोबती झाले आहेत. पण अजूनही त्यांचे हवे तसे मनोमिलन झालेले दिसत नाहीत. महायुतीच्या मेळाव्यात पाटील यांना मानाचे स्थान देण्यात येत आहे. त्यामुळे आधीचे मतभेद बाजूला सारून ते प्रचारात उतरले आहेत. आनंद परांजपे अजूनही यापासून अलिप्तच असल्याचे दिसते. डोंबिवलीत नुुकत्याच झालेल्या खासदारांच्या अहवाल प्रकाशनाच्या वेळी परांजपे गैरहजर होते. इतर ठिकाणीही ते प्रचारात उतरले नाहीत. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अखेर ते शनिवारी कळवा आणि अंबरनाथ येथील महायुतीच्या मेळाव्यात दिसले.

२०१४ मधील लढत
शिवसेना - डॉ. श्रीकांत शिंदे - ४,४०,५७४ मते
राष्ट्रवादी - आनंद परांजपे - १,९०,००६
मनसे - प्रमोद ऊर्फ राजू पाटील - १,२२,२५५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com