गृहप्रकल्पातील सुविधांची माहिती लेखी देणे बंधनकारक

गृहप्रकल्पातील सुविधांची माहिती लेखी देणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी करताना विकसक वेगवेगळ्या सोयी-सुविधा देणार असल्याचे सांगतात. त्यानुसार करारनाम्यातही त्याचा उल्लेख केला जातो; मात्र या सुविधा कधी देणार याचा कालबद्ध कार्यक्रम नसतो. त्यामुळे इमारत उभी राहिल्यानंतरही विकसक सोयी-सुविधा देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी करारनाम्यात नमूद केलेल्या सोयी-सुविधा कधी देणार, याची लेखी माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार आदर्श विक्री कराराचा प्रस्ताव महारेराने तयार केला असल्याने विकसकांच्या मनमानीला चाप लागणार आहे.
गृहनिर्माण प्रकल्पातील घरे लवकरात लवकर विकली जावीत, म्हणून विकसक प्रकल्प परिसरात स्विमिंग टॅंक, जिम, सभागृह, मंदिर, खेळाचे मैदान, बगीच्या अशा फाइव्ह स्टार सुविधा देण्याचे आश्वासन देतात. तसेच या सुविधांचा करारनाम्यातही उल्लेख केला जातो. मात्र, या सुविधा देण्याबाबत कोणतीच डेडलाईन नसते. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्प झाल्यानंतरही सोयी-सुविधा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पैसे मोजूनही ग्राहकांना गैरसोय सहन करावी लागते. त्याची गंभीर दखल महारेरा प्राधिकरणाने घेतली असून करारनाम्यात नमूद केलेल्या सुविधा कधी, कशा देणार, याबाबत लेखी माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्राधिकरणाने प्रस्ताव तयार केला आहे.
--------------------
विक्री कराराचा भाग होणार
प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा कशा असतील, त्याचा आकार, दर्जा कसा असेल, त्या कधीपासून उपलब्ध होतील, याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार असल्याचे नवीन आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित आदेशामध्ये दिलेले जोडपत्र विक्री कराराचा भाग म्हणून देणे बंधनकारक आहे. घर खरेदीदारांच्या दृष्टीने याचेही महत्त्व लक्षात घेता ही तरतूदही अपरिवर्तनीय राहणार आहे.
--------------------
हरकती पाठवण्याचे आवाहन
रेरा प्राधिकरणाने आदर्श विक्री कराराचा मसुदा आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबत कोणाच्या सूचना, हरकती असल्यास त्या secy@maharera.mahaonline.gov.in या ईमेलवर २७ मेपर्यंत पाठवण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com