पालिकेच्या वाहनांचा व्यावसायिक वापर

पालिकेच्या वाहनांचा व्यावसायिक वापर

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : गेल्या महिन्यात भिवंडी महापालिका प्रशासनाने कामात हलगर्जीपणा केल्याने सफाई ठेकेदाराचा ठेका रद्द केला होता; मात्र ठेकेदाराने अद्यापही महापालिकेची वाहने आरोग्य विभागाला परत केलेली नाहीत. या ठेकेदाराने खासगी संस्थांकडून पैसे घेत पालिकेच्या वाहनांतून कचरा उचलत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर आयुक्तांनी मागील सफाई ठेकेदाराला नोटीस बजावून महापालिकेची वाहने दुरुस्त करून दिलेल्या स्थितीत प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. तसेच ही वाहने तातडीने परत न केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून थकबाकीची रक्कम वसूल केली जाईल, असा इशाराही ठेकेदाराला दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या काही वाहनांचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी त्याचे भाडे पालिका वसूल करणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी महापालिकेने मुंबई बोरिवलीस्थित आर अँड बी इंफ्रा कंपनी या ठेकेदाराला शहरातील कचरा उचलण्यासाठी ५० घंटागाड्या आणि २३ आरसी गाड्या खरेदी करून दिल्या होत्या. या ठेकेदाराला पालिका प्रशासनाने मे २०२२ मध्ये शहरात दररोज निर्माण होणारा ५५० टन कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचे कंत्राट दिले होते. १,२२९ रुपये प्रतिटन दराने हे कंत्राट देण्यात आले. तसेच कचरा उचलण्यासाठी महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च करून ५० घंटागाड्या आणि २३ कॉम्प्रेसर खरेदी करून अवघ्या एक रुपयाच्या नाममात्र शुल्कात ठेकेदाराला दिले होते. भिवंडी महापालिकाही कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराला दरमहा सुमारे अडीच कोटी रुपये देत होती; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने मार्च २०२४ या महिन्यात कचरा ठेकेदाराचा ठेका रद्द केला होता. यानंतर महापालिकेच्या पाच प्रभाग समिती क्षेत्रातील कचरा उचलण्याचे कंत्राट पाच छोट्या कंत्राटदारांना देण्यात आले.

भिवंडी निजामपूर महापालिकेने मागील ठेकेदाराला दिलेली घंटागाडी व इतर साधनसामग्री अद्याप पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केलेली नाही. महानगरपालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे कचरा ठेकेदार मनपाच्या डोळ्यात धूळफेक करत जुने कंत्राटदार आजही शहरातील खासगी व्यावसायिक आस्थापनांकडून पैसे घेऊन महापालिकेची वाहने वापरून कचरा उचलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर ठेकेदाराने महापालिकेची वाहने ठिकठिकाणी सोडून दिली आहेत. नुकताच शहरात एका नादुरुस्त वाहनाला आग लावण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच हा कचरा वाहून नेणारे वाहन क्रमांक एम एच ०४ / केयू ५६२८ हे शहरातील अवचित पाडा परिसरात प्रभाग समिती एकच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यामुळे पालिकेच्या वाहनांचा खासगी कामांसाठी वापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला.

फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा
प्रशासनास ही माहिती मिळताच आयुक्त अजय वैद्य यांनी जुन्या कचरा ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. सफाई ठेकेदाराने वापरलेल्या महापालिकेच्या वाहनांची दुरुस्ती करून दिलेल्या स्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. मात्र, ठेकेदाराने अद्यापही वाहने महापालिकेच्या आरोग्य विभागात जमा केलेली नाहीत. वाहने परत न केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा कंत्राटदाराला देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com