जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ७७ नामनिर्देशन पत्र वाटप

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ७७ नामनिर्देशन पत्र वाटप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात सोमवारी ७७ अर्ज वितरण करण्यात आले; तर ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्याकडूनही डमी नामनिर्देश अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ मोडतात. पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सोमवारी नामनिर्देशन अर्ज दाखल व वितरणाच्या दिवशी तिन्ही मतदारसंघांत ७७ अर्ज वितरित केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठाणे लोकसभेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहेत. त्यानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत २१ नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले; तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे व ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारी यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी २८ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले; तर दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत २८ नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आली; तर अपक्ष उमेदवार म्हणून सचिन साहेबराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com