खरेदीमुळे सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांवर

खरेदीमुळे सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांवर

खरेदीमुळे सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांवर

जागतिक शेअर बाजारात अनुकूल वातावरण
मुंबई, ता. २९ : बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरची आज जोरदार खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी आज एक ते सव्वा टक्का तेजी अनुभवली. आज सेन्सेक्स ९४१.१२ अंश वाढला. तर निफ्टीत २२३.४५ अंशांची वाढ झाली. सेन्सेक्सने आज पुन्हा ७४ हजारांचा टप्पा सर केला.

अमेरिकी कंपन्यांच्या कामगिरीची चांगली आकडेवारी आल्याने आज जागतिक शेअर बाजारांमधील वातावरण अनुकूल होते. त्यामुळे भारतातही शेअरची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आधीच्या सत्रांमधील सगळा तोटा धुवून निघाला. दिवसअखेर सेन्सेक्स ७४,६७१.२८ अंशांवर तर निफ्टी २२,६४३.४० अंशांवर स्थिरावला. 

आज बांधकाम व्यवसाय क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रे तेजीत होती. मिडकॅप शेअर निर्देशांक एक टक्का वाढला, तर स्मॉलकॅप शेअर निर्देशांक स्थिर राहिला. आज आरोग्य, धातूनिर्मिती, ऊर्जानिर्मिती, बँका, ऑइल अँड गॅस ही क्षेत्रे अर्धा ते दोन टक्का वाढली. तर बँक निफ्टीदेखील अडीच टक्क्यांच्या आसपास वाढला. सेबीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर शुल्कवाढ आकारल्याने सकाळी तो शेअर १८ टक्के घसरला होता. दिवसअखेर तो शेअर पावणेचौदा टक्के म्हणजेच ४३९.१० रुपयांनी कोसळून २,७७१.२५ रुपयांवर स्थिरावला. या शेअरची नोंदणी शेअर बाजारात झाल्यानंतर ही त्याच्यातील सर्वात मोठी घसरण आहे.


आज बीएसईवर एचसीएल टेक पावणे सहा टक्के म्हणजे ८५ रुपयांनी घसरला, तर आयटीसी, विप्रो, बजाज फिन्सर्व्ह हे शेअर किरकोळ घसरले. त्याखेरीज सेन्सेक्समधील अन्य सर्व शेअर फायद्यात होते. आयसीआयसीआय बँक पावणेपाच टक्के, स्टेट बँक व इंडसइंड बँक तीन टक्के, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, पावणेतीन टक्के वाढले. एनटीपीसी, कोटक बँक दोन टक्के, टीसीएस, बजाज फायनान्स दीड टक्का वाढले. एचडीएफसी बँक, सन फार्मा, नेसले, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, महिंद्र आणि महिंद्र, टेक महिंद्र हे शेअर एक टक्का वाढले.

..
आयसीआयसीआय बँक आठ लाख कोटी
आठ लाख कोटी रुपये भांडवली बाजारमूल्याचा टप्पा गाठणारी आयसीआयसीआय बँक ही भारतातील सहावी कंपनी आणि देशातील दुसरी बँक ठरली. आज या बँकेचा शेअर पावणे पाच टक्के म्हणजेच ५२ रुपये वाढून १,१६० रुपयांवर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एअरटेल या कंपन्यांचे भांडवली बाजारमूल्य आठ लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

..
भारतीय बँकांची कामगिरी चांगली झाल्यामुळे तसेच आखातातील तणाव कमी झाल्यामुळे आता शेअर बाजार सकारात्मक राहील, असा अंदाज आहे. अमेरिकी आकडेवारीवरही आता सर्वांचे लक्ष राहील. 
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस

..
रुपया दहा पैसे घसरला 
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपया दहा पैसे घसरून ८३.४८ वर स्थिरावला. आज रुपयाचे व्यवहार ८३.३९ वर सुरू झाले. तर दिवसभरात त्याने ८३.५१चा निचांक केला होता; पण शेअर बाजारातील तेजी तसेच कच्च्या तेलाचे घसरलेले भाव यामुळे त्यातील तोटा मर्यादित राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com