ठाणे पालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोकळी

ठाणे पालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोकळी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : महापालिकेत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विविध विभागांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे. त्यात मंगळवारी (ता. ३०) पुन्हा पालिकेचे ३८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह, उपनगर अभियंता आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेचा वाढता कामाचा व्याप लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी पडत आहे. त्या प्रमाणात भरती मात्र होताना दिसत नाही. जानेवारीत २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत त्यात आणखी २३ जणांची भर पडली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. दिवसेंदिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे पालिकेच्या विविध विभागांत पोकळी निर्माण झाली आहे.

मंगळवारी ३८ अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये शहर विभागातील उपनगर अभियंता नितीन येसुगडे, कळवा रुग्णालयातील डॉ. शैलेश्वर नटराजन (प्राध्यापक), चित्रा लहिरे, रमाकांत बुरपुल्ले (कार्यालयीन अधिक्षक), भरत लोखंडे (मुख्याध्यापक), पाच प्राथमिक शिक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, सहायक सुरक्षा अधिकारी, वाहनचालक, शिपाई, आया, मुकादम, बिगारी, सुपिरिअर फिल्ड वर्कर आणि १४ सफाई कामगारांचा समावेश आहे.

एका शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी
महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३५ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळांमध्ये ९०० पदे मंजूर असली तरीदेखील प्रत्यक्षात ६७० शिक्षकच उपलब्ध आहेत. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकविण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com