महाविकास आघाडीकडून लोकशाहीचा खून

महाविकास आघाडीकडून लोकशाहीचा खून

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : हनुमान चालिसा पठन करणाऱ्या रवी राणा व नवनीत राणा या दाम्पत्याला जेलमध्ये टाकण्याचे काम महाविकास आघडी सरकारने केले. त्याचबरोबर काही पत्रकारांना तसेच काही निरपराध लोकांनाही तुरुंगात टाकले. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे आणि लोकशाहीचा खून करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकारने केले, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यात कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिंदे बोलत होते.

कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा संघटक विवेक खांबकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करत मतदारांशी बेईमानी करून त्यांचा विश्वासघात केला. त्यांनी केलेली चूक आम्ही सुधारून बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार राज्य स्थापन केले आहे. त्यामुळे ते जो आमच्याबद्दल शब्द उच्चारतात, तो आम्हाला लागू न होता तो त्यांनाच लागू होतो, अशी टीका शिंदे यांनी केली.

राज्यामध्ये झालेली विकासकामे आणि शेतकरी, ज्येष्ठ, युवा, महिला वर्गासाठी घेतलेले निर्णय यामुळे लोक सरकारच्या कामाने प्रभावित झाले आहेत. प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे आमचे सरकार आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत असून तो आणखी वाढतच जाणार आहे, असे शिंदे म्हणाले.

‘संविधान बदलाची चर्चा दिशाभूल करणारी’
देशात आणि राज्यात विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवत असून यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय बोलावे आणि काय आरोप करावे, हेच सुचत नसल्यामुळे आम्ही केलेल्या विकासकामांवरून लोकांचा लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान बदलाची चर्चा करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com