दिवाळे कोळीवाड्यात गावदेवी उत्सव

दिवाळे कोळीवाड्यात गावदेवी उत्सव

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : कोळी-आगरी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीची चैत्र शुद्ध सप्तमीची यात्रा झाल्यानंतर प्रत्येक गावागावांत जत्रेचे वेध लागलेले असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावकीची जत्रा ही विशेष मानली जाते. प्रत्येक गावाची जत्रा साजरी करण्याची पद्धतही वेगळी असते. यात नवी मुंबईमधील दिवाळे कोळीवाड्यातील गावकीची जत्रा ही पंचक्रोशीत खास असते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळे गावात पारंपरिक पद्धतीने गावदेवी मरूबाईची जत्रा साजरी करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची वर्षभर ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहतात. मंगळवार व बुधवार दोन दिवसांच्या जत्रेत गावाच्या व वेशीवरच्या देवांना मान देण्याची प्रथा आजही ग्रामस्थ पाळतात. जत्रेच्या आदल्या दिवशी गावातील महिला-पुरुष गावदेवीच्या मंदिरात एकत्र येऊन जागरण अर्थात बायांची गाणी गायली जातात. त्यानंतर मुख्य जत्रेच्या दिवशी सकाळपासूनच गावात प्रत्येकाच्या घरी जत्रेचा उत्साह पाहायला मिळतो. गावकीच्या प्रथेनुसार जत्रेच्या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. बकऱ्याचा बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून बकऱ्याचे मटण प्रत्येकाच्या घरोघरी दिले जाते.

-------
‘सातरा’ आणि ‘तरवा’ची प्रथा
मरूबाईची जत्रा आणि गावच्या वतीने विधिवत ‘सातरा’ व ‘तरवा’ काढण्यात आला. दुपारच्या सुमारास भाविकांच्या समवेत पारंपरिक वाद्यांसह ‘आमची मरुबाई येते आम्हावर गुलाल फेकीते, या या गुलालाचा मान आमच्या येण्या झाल्या लाल’ या देवच्या पारंपरिक गाण्यावर गावातील वयोवृद्ध महिला ताल धरू लागतात. या वेळी फुलांनी सजवलेली आणि खणा-नारळाने भरलेली टोपली या ‘सातरा’ची विशेषता मानली जाते. ‘सातरा’ची टोपली डोक्यावर घेऊन जाण्याचा मान गावच्या पाटलाला देण्यात येतो. विशेष म्हणजे, देवीच्या पुजारी (भक्तिनी) या वर्षभर पायात चप्पल घालत नाहीत. मात्र, या देवीचा मानपान झाल्यानंतर टोकदार खिळ्यांच्या चप्पल परिधान करतात, या श्रद्धेने त्यांना जराही त्रास जाणवत नाही.

----------
दोन दिवस मासेमारी बंद
गावाच्या मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मानाने भरलेली ही टोपली समुद्रकिनारी सोडण्यात आली. त्यावेळीही बोकडाचा मान देणे हेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर गावात उत्साहाने जत्रा साजरी होते. संध्याकाळी पालखी मिरवणूक बघण्यासाठी मोठी गर्दी होते. दोन दिवस गावात जत्रेची धामधूम व घरोघरी मांसाहाराचा जोरदार बेत रंगलेला असतो. दिवाळे गाव हा ताज्या मासळीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय जरी असला तरी जत्रेच्या दोन दिवसांत कोणीही मासे विक्रीसाठी घराबाहेर जात नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com