सव्वाशे आदिवासी वाड्या रस्त्याविना

सव्वाशे आदिवासी वाड्या रस्त्याविना

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : जिल्ह्यातील ६८५ आदिवासी वाड्यांपैकी १२५ वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ताच नाही. वाड्यापर्यंत रस्ते नसल्याने आरोग्य, शिक्षण यासह आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य पोहचविताना अडचणी निर्माण होत आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर नेतेमंडळी येथील ग्रामस्थांना आश्‍वासने देत विकासाची स्वप्ने दाखवतात; परंत निवडणुका संपताच आश्‍वासने हवेत नाहिशी होतात. अशी आश्‍वासने वर्षानुवर्षे दिली जात आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आपत्तीच्या वेळी या वाड्यांवर मदत पोहचवता येत नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राज्य सरकार आणि प्रशासनाने खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी, ठाकूर वाडीवर जाण्यासाठी रस्ता तयार केला असता तर बचाव कार्याला वेग आला असता आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्यांना वाचवता आले असते. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका शेकडो निष्पापांना बसत असल्याचे आदिवासी बांधवांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीदेखील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर रस्ते पोहचावेत यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले होते. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, १५ तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे. मात्र, या संबधित विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. या वाड्या काही शतकांपासून आहेत, त्यांना ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. त्यातील काहींना महसुली दर्जा आहे; मात्र त्या वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने वाड्या विकासापासून दूर राहिल्या आहेत.
----
जनता दरबारात मांडले होते गाऱ्हाणे
जिल्ह्यात ६८५ वाड्या आहेत. यापैकी १२५ आदिवासी वाड्या, वस्त्यांवर अद्यापही रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे उलटली आहेत; मात्र मूळ निवासी हा सर्वसाधारण सोयी-सुविधांपासून आजही वंचित असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मांडली होती. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार भरवला होता. विविध नागरिक आपापल्या समस्या, गाऱ्हाणे या वेळी मांडत होते. त्यामध्ये आदिवासी वाडी, वस्त्यांवरील रस्त्यांचा प्रश्‍नदेखील उपस्थित करण्यात आला होता, अशी माहिती संतोष ठाकूर यांनी दिली. हा गंभीर प्रश्‍न सामंत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने यावर मंत्रालयात बैठक बोलावली होती; मात्र पुढे राजकीय उलथापालथीमध्ये हा विषय मागे पडला असावा, असेही ठाकूर यांनी अधोरेखित केले.

--------
वनविभागाकडून आदिवासी समाजाला सातत्याने विविध कायद्यांचा धाक दाखवण्याचे काम केले जाते. विकासकामांसाठी वन विभागाच्या तब्बल २८ परवानग्या काढाव्या लागतात. तसेच नकाशासाठी किमान २० हजार रुपये खर्च करावे लागतात. ही खर्चिक बाब आहे, त्यामुळे आदिवासी बांधव अशा भानगडीत पडत नाहीत.
- संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

गावात रस्ता नसल्याने इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. शिक्षण, आरोग्य अशा सर्वच समस्या आहेत. एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला डोलीतून घेऊन खाली आणावे लागते. रस्ता नसल्यामुळे अतिगंभीर असलेल्या अनेकांना प्राण गमावलेले आहेत.
- शांताराम पवार, सागरगडमाची, अलिबाग

--------
काही वाड्या खूपच दुर्गम भागात आहेत. तेथे बांधकामाचे साहित्य घेऊन जाणे शक्य होत नाही. यातील काही वाड्यांवर रस्ते बनवण्यात आलेले आहेत; परंतु मुसळधार पावसाने रस्ते खराब होतात. उभ्या चढावावर डांबर किंवा काँक्रिटचे रस्ते बनवणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसते. तेथे वाहने चालूच शकत नाही, त्याचबरोबर लोकांनाही पावसाळ्यात चढ चढताना त्रास होत असतो. इर्शाळवाडी घटनेनंतर काही दुर्गम भागातील वाड्यांच्या रस्त्यांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्या प्रस्तावांवर अभ्यास केला जात आहे.
- जगदीश सुखदवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

---------
अनेक पिढ्या आम्ही वाडीवर घालवलेल्या असल्याने तेथून शहरात जावे असे वाटत नाही. निवडणुका आल्यावर नेतेमंडळी गावाकडे येतात आणि रस्ता बनवून देण्याचे आश्‍वासन देतात. असे अनेकवेळा झालेले आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांसह खारदारकीच्या निवडणुकांमध्ये अशी आश्‍वासने देण्यात आलेली आहेत.
- सुरेश शिद, ठाकूरवाडी, रोहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com