रखडलेला विकास मार्गी लागेल का?

रखडलेला विकास मार्गी लागेल का?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्य सरकारने धारावीसाठी वेगळे धोरण जाहीर करू, अशी घोषणा काही वर्षापूर्वी केली. धारावीकरांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. आघाडीचे सरकार जाऊन युतीचे सरकार येऊन गेले; पण धारावीकरांचा विकास काही झाला नाही. त्यामुळे तब्बल २० वर्षे धारावीतील जवळपास दहा लाख रहिवाशांचा एक महत्त्वाचा प्रश्न अधांतरिच राहिला आहे. तो प्रश्न आतातरी खरंच मार्गी लागेल का, असा प्रश्न त्यांना पडला आहे.   
‘धारावीचा विकास करावा’ असे येथील राज्यकर्त्यांना उमगायला ९०चे दशक उजाडावे लागले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८५ साली धारावीचा विकास करण्याकरिता ३५ कोटी उपलब्ध करून दिले होते. विकासाच्या नावाने जागतिक बँक प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन, पंतप्रधान अनुदान प्रकल्प, राजीव गांधी पुनर्वसन योजना या काँग्रेस राजवटीत आणल्या गेलेल्या योजना होत्या. त्यानंतर १९९५ साली राज्यात आलेल्या युतीच्या शासनाने मोफत घर योजना, शिवशाही पुनर्वसन योजना लागू केल्या. या सर्व योजना धारावीत काही प्रमाणात लागू झाल्या. मात्र, धारावीच्या विकासाला वेग आला नाही.
२००४ साली महाराष्ट्र शासनाने धारावीचा एकत्रित विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करण्याचे जाहीर करून तसा शासकीय निर्णय (जी.आर.) जाहीर करून तत्कालीन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती स्थापन केली. महाराष्ट्र शासनाने गेल्या वीस वर्षांपासून विविध मार्गांनी ही योजना चालू करण्याचा प्रयत्न केला. यात पहिल्यांदा धारावीला नऊ सेक्टरमध्ये विभागून जागतिक पातळीवर विकसकांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया राबविली गेली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शासनास धारावीची लोकसंख्या आणि पात्रता निश्चित करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्या. त्यात खूप वेळ गेल्यामुळे योजना रखडत गेली. आता तरी आमची ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी धारावीतील रहिवासी करत आहेत.
.................
२०१९ ची स्थिती....
विजयी उमेदवार - राहुल शेवाळे
मिळालेली मते - ४,२४,९१३
धारावीतून मिळालेली मते - ५३,९५४
पराभूत उमेदवार - एकनाथ गायकवाड
................
आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक
२० वर्षांपासून पुनर्विकास रखडला
१० लाख धारावीकरांचे विकासाकडे डोळे
१९८५ पासून विकासाला सुरुवात  
धारावी पुनर्विकासाबद्दल आजही संभ्रम कायम
..............
काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी धारावी विकासाचे राजकारण चालविले आहे. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी अजून जटिल बनत चालला आहे. जर विकासाला गती द्यायची असेल तर अगोदर लोकांमध्ये असलेला गोंधळ व आणि भीती दूर करावी लागेल. याकरिता शासकीय पातळीवर हालचाल निर्माण करणे गरजेचे आहे.
- संतोष लिंबोरे, सामाजिक कार्यकर्ते
....................
लोकांचे काही अनुत्तरित आहेत. यात मोठी भीती आहे की, आम्हाला धारावीतच घर मिळणार की आम्ही धारावीच्या बाहेर फेकले जाणार आहोत?
- हिलडा नाडार, रहिवासी
...................
आम्हाला ‘विकास’ हवा आहे; पण राजकीय पक्ष केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरते ‘विकासाचा’ मुद्दा निर्माण करतात. हे लक्षात ठेवूनच मतदान करण्याचे ठरवले आहे.
- आर्यन चोगले, नवमतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com