मतदान जनजागृतीसाठी पनवेल पालिका आघाडीवर

मतदान जनजागृतीसाठी पनवेल पालिका आघाडीवर

मतदान जनजागृतीसाठी पनवेल पालिका आघाडीवर
शहरात शेकडो फलक; ५५ हजार आवाहन पत्रकांचे वाटप
पनवेल, ता. १ (बातमीदार) : एकीकडे तीव्र उन्‍हाळा जाणवत असला तरी दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्‍वर वाढत चालला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात दोन टप्‍प्‍यातील निवडणुका सुरळीत पार पडल्‍या आहेत. मात्र, यामध्ये मतदानाचा टक्‍का काहीसा कमी झाला आहे. त्‍यामुळे उर्वरित निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्‍का वाढण्यासाठी पनवेल महापालिकेने मतदान जनजागृतीवर जोर दिला आहे. शहरात विविध ठिकाणी शेकडो फलक लावण्यात आले आहेत. तर ५५ हजार आवाहन पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.
एरवी शहरातील जाहिरात फलकावर विविध कंपन्यांच्या जाहिराती झळकताना दिसतात; परंतु पनवेलमध्ये यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वत्र सचिन तेंडुलकरच्‍या माध्यमातून मतदान जनजागृती करताना दिसून येत आहे. लोकसभा स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिका व तहसील कार्यालयाच्या वतीने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुमारे १८ ठिकाणी मोठे फलक व ६० ठिकाणी छोटे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध रेल्वे स्टेशन, मॉल्स अशा १२ ठिकाणी सेल्फी पॉईंट मतदान जनजागृती करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. तसेच मागील निवडणुकीमध्ये मतदान कमी असणाऱ्या भागांमध्ये महापालिकेकडून आवाहन पत्रकाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने सुमारे ५५ हजार आवाहन पत्रके छापण्यात आली आहेत. मतदान केंद्राच्या परिसरातील नागरिकांमध्ये प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून आशा सेविका व बचत गटाच्या महिला आवाहन पत्रकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करत आहेत. तसेच आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदार संघातर्गत स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप व पनवेल तहसील कार्यालय यांच्या सूचनेनुसार होर्डिंग्ज, बॅनर, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. याचबरोबर नुकतेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत कळंबोली येथील सुजल मार्केट झोपडपट्टी येथे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच आशा सेविकांनी सेक्टर नऊ कामोठे, सेक्टर ३५ खारघर, तळोजा सेक्टर ११ दर्गा वाडी, सेक्टर सात नवीन पनवेल येथे नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे. एरवी जाहिराती बघण्याची सवय लागलेल्या नागरिकांना मतदान जनजागृतीचे फलक पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com