बाणगंगा पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग

बाणगंगा पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मलबार हिल येथील बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम पालिकेकडून प्रगतिपथावर आहे. यात वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. तलावाचे खोलीकरण आणि दीपस्तंभ पुनरुज्जीवन कामे सुरू करण्यात आली आहेत. लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील, अशी माहिती पालिकेने दिली.
महापालिकेच्या वतीने ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवीकरण केले जात आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तलाव प्रवेश पायऱ्यांवरील १३ झोपड्या काढण्यात आल्या आणि त्यातील रहिवाशांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नजीकच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी प्रशासनाला कोणतीही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही, असेही शरद उघडे यांनी सांगितले.

पुरातत्त्व विभागाचे सहकार्य
बाणगंगा भागात विविध देवीदेवतांची मंदिरे, रामकुंड आदी धार्मिक स्थळेही आहेत. त्यामुळे या कामात त्यासाठी पुरातत्त्व विभाग आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहेत. त्यानुसार, संपूर्ण परिसराचा विकास करण्याची कामे सुरू आहेत. येथील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या वास्तविकतेला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्यांचे तत्कालीन रूप आहे त्या स्थितीतच दिसावे, या अनुषंगाने त्याकाळी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने गाळ काढला जात आहे, अशी माहितीही उघडे यांनी दिली.

तीन टप्प्यांत कामे
१) बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाची कामे तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुनर्उभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई, तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी मीसिंग लिंक विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यावरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.
२) दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे दर्शनी भाग एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतींवर भित्तिचित्रे चितारणे व शिल्पे घडविणे, रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com