मुंबईत शिंदे गटाची ‘परीक्षा’

मुंबईत शिंदे गटाची ‘परीक्षा’

विष्णू सोनावणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुंबईतील सहापैकी तीन मतदारसंघांत शिंदे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, राहुल शेवाळे यांची उमेदवारी वगळता इतर दोन मतदारसंघांत पक्षाने उमेदवार निवडण्यात जास्त वेळ घालवला आहे. त्याचा फायदा ठाकरे गटाला झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे मुंबईत अपेक्षित ताकद निर्माण करता आली नसल्याने शिंदे गटाला अजूनही भाजपच्या मदतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
मुंबईत तीन जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. मात्र, ठाकरे गटाने मुंबईतून अरविंद सांवत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, संजय दिना पाटील यांची उमेदवारी २८ मार्चला घोषित करताना प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांची उमेदवारी महिनाभरापूर्वी जाहीर केली होती, तर इतर दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात वेळ लावला. आता पक्षाने पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना, तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांची उमेदवारी मंगळवारी (ता. ३०) जाहीर केली. मात्र, तोपर्यंत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी प्रचाराचा पहिला टप्पाही पूर्ण केला असल्याने शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी फार मेहनत करावी लागणार आहे.
--------------------------------------------------------
मुंबईत ठाकरे गटाचा वरचष्मा
- गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती होती. त्यामुळे दोघांचीही मते एकमेकांना अदलाबदली झाल्यामुळे शिवसेना, भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला होता. यावेळी शिंदे गट भाजपसोबत, तर ठाकरे गट काँग्रेससोबत आहे. मात्र, मुंबईत मराठी जनमानसावर अजूनही उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईत ठाकरे गटातील नेते, लोकप्रतिनिधी पक्षासोबत बऱ्यापैकी टिकून आहेत.
- दुसरीकडे शिंदे गटाला अजूनही मुंबईत आपली ताकद निर्माण करता आलेली नाही. मुंबईतील लोकप्रतिनिधी शिंदे गटात दाखल झाले. मात्र, जनतेचा विश्वास त्यांना अजूनही संपादन करता आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सक्रिय असल्याचे चित्र आहे.
------------------------------------------------
भाजपच्या मतांवर भिस्त
या निवडणुकीत शिंदे गटाची भाजपवर भिस्त आहे. त्यांच्या मतांवर शिंदे गट अवलंबून असल्याचे दिसते. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे मतदार आणि उमेदवारांची वैयक्तिक मते अधिकाधिक कशी मिळविता येतील, याचे गणित आता शिंदे गटाचे उमेदवार करत आहेत. गेल्या वेळी शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेली मतांची टक्केवारी टिकवण्याचाही प्रयत्न शिंदे गटाचा आहे.
-----------------
२०१९ च्या निवडणुकीचे चित्र
मतदारसंघ उमेदवार मिळालेली मते मतांची टक्केवारी
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत ४,२१, ९१९ ५२.६४
उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर ५,७०,०६३ ६०.७४
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे ४,२४,९१३ ५३.३
-----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com