मोदी तुझसे बैर नही, हीना ''तेरी खैर नही

मोदी तुझसे बैर नही, हीना ''तेरी खैर नही

मोदी तुझसे बैर नहीं, हीना तेरी खैर नहीं!

नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्याविरोधात नाराजी

सकाळ न्यूज नेटवर्क / पांडुरंग म्हस्के

नंदुरबार लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात २०१९ मध्ये दुसऱ्यांदा खासदार झालेल्या भाजपच्या हिना गावित पुन्हा विजयी होऊन हॅट्‌ट्रीक करतात की काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी हे आपले वडील आमदार के. सी. पाडवी यांच्या पराभवाचा बदला घेतात, याकडेच लक्ष लागून राहिले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हीना गावित यांना त्यांच्या या मतदारसंघात होत असलेला विरोध हीच गोवाल पाडवी यांच्यासाठी जमेची बाजू असली, तरी काँग्रेसचा उमेदवार हा येथील मतदारांची पसंती नाही. त्यामुळेच ‘मोदी तुझसे बैर नहीं, हीना तेरी खैर नहीं’ अशी घोषणा हीना गावित यांचे विरोधक येथे देत आहेत. त्यामुळे हीना गावित नकोत हाच येथील प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. मतदारसंघात असलेले गावित कुटुंबीयांचे प्राबल्य हाही येथील महत्त्वाचा मुद्दा आहे. हीना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे राज्यात मंत्री आहेत, तर जिल्हा परिषद अध्यक्ष, आणि अन्य चार जिल्हा परिषद सदस्य हे गावित यांच्याच परिवारातील आहेत. तर एक पंचायत सदस्य विजय कुमार गावित यांचा सख्खा भाऊ आहे. याबाबत येथील मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा सामना हीना गावित यांना करावा लागणार आहे.
हीना गावित यांची छोटी बहीण सुप्रिया गावित या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. आई कुमुदिनी गावित या जिल्हा परिषद सदस्या, संजय गावित हे बंधू जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर सख्ख्या दोन पुतण्या अर्चना आणि राजश्री गावित या जिल्हा परिषद सदस्या आहेत. प्रकाश गावित हा आणखी एक भाऊ पंचायत समिती सदस्य आहे. त्यामुळे गावित कुटुंबाच्या परिवाराबाबत जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे समाजाला सोबत न घेता गावित कुटुंब केवळ आपल्या परिवारापुरतेच पाहते, अशी भावना येथील मतदारांमध्ये आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये दुजाभाव करणे, या खासदार गावित यांच्याविरोधात जाणाऱ्या गोष्टी ठरत आहेत.
महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यात गावित कुटुंबाबाबत नाराजी आहे. खासदार गावित यांना उमेदवारी दिल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाने उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रचारापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) चंद्रकात रघुवंशी यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपला विरोध नसून डॉ. गावित कुटुंबीयांना असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, अजित पवार गटाचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि खुद्द भाजपचेच काही कार्यकर्ते छुप्या पद्धतीने थेट काँग्रेसला मदत करीत आहेत. या लोकसभा मतदारसंघात १२ लाख आदिवासी, एक लाख ४० हजार मुस्लिम आणि ६० हजार दलित मतदार आहेत. उर्वरित पाच लाख मतदार हे गुजर, मराठा आणि राजपूत तसेच कोळी आणि माळी समाजाचे आहेत.
-----
भारत जोडो यात्रेचा फायदा?
दुसरीकडे गोवाल पाडवी यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असली, तरी केवळ हीना गावित यांना विरोध म्हणून मतदार त्यांना प्रतिसाद देत आहेत. गोवाल यांच्या प्रचारात त्यांचे वडील के. सी. पदवी त्यांना मदत करीत आहेत. पाडवी यांच्या प्रचाराची आदिवासी गाणी चांगलीच लोकप्रिय ठरत आहेत. विशेष म्हणजे, यातील काही गाण्यांना आमदार के. सी. पदवी यांनी संगीत दिलेले आहे. पेशाने वकील असलेले गोवाल यांचा मतदारसंघावर फारसा प्रभाव नसला, तरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या मतदारसंघातून झालेली असल्याने त्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
------
भाजपचा वरचष्‍मा
भाजपचा नंदुरबार शहरात असलेले वर्चस्व पाहता भाजपला ही जागा जिंकणे अवघड नाही. त्यामुळे या भागात जास्तीचे मतदान काँग्रेसला कसे होईल, याकडे गोवाल पाडवी यांचा कटाक्ष आहे. त्याचबरोबर अक्कलकुवा, नवापूर, शहादा आणि साक्री या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसला चांगला प्रतिसाद आहे. शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे पाडवी यांना येथून जिंकणे सहज शक्य होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com