नवी मुंबईत नाराजी‘नाट्य’

नवी मुंबईत नाराजी‘नाट्य’

नवी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी‘नाट्य’

नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याच्या विरोधात पडसाद

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असणारी ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर शिवसेना शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांच्या पदरात पडली आहे. मात्र, यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गणेश नाईक यांच्या ‘क्रिस्टल हाऊस’बाहेर आज जोरदार घोषणाबाजी करून राजीनामे दिले. याचदरम्यान नाराजी दूर करून नाईक यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी तेथे पोहोचलेल्या म्हस्के यांनी नाराजी‘नाट्या’चा सामना टाळण्यासाठी पाठीमागच्या दारातून वाढ काढली.
ठाणे लोकसभेसाठी माजी खासदार संजीव नाईक यांनी दंड थोपटले होते. मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटीगाठींवर त्यांनी भर देत उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या अटीतटीच्या वाटाघाटीत हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. यात शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. याबाबत कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी नाईकांनी क्रिस्टल हाऊसवर कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध करून संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यास भाजपवर अन्याय होईल, अशा भावना व्यक्त केल्या. संतापलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गणेश नाईक यांनी समजूत काढत सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान करायचे आहे, त्यासाठी नरेश म्हस्के यांना निवडून आणावे लागेल, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांनीही महायुतीचे काम करण्याचे आवाहन उपस्थित शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
----------------------------
राजीनाम्यांमध्ये माजी नगरसेवकांचा समावेश
माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत, नेत्रा शिर्के, सूरज पाटील, शुभांगी पाटील, विजय वाळुंज आदींनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांनी संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, भाजपच्या पदाचा राजीनामा दिला.
-----------------------------
...हे तर नाईक समर्थक!
ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांना दिल्यामुळे नवी मुंबई भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जे नाराज झाले आहेत, ते मूळ भाजप समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाहीत. ते नाईक समर्थक असल्याची प्रतिक्रिया बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. भाजपचे जुने आणि जाणते पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षाने दिलेल्या कोणत्याही उमेदवाराचे काम करण्यास बांधील असतात. आम्ही जीवाचे रान करून म्हस्के यांना निवडून आणू. याआधीसुद्धा नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नाराजीनाट्य घडवून आणले होते. हादेखील त्यापैकी एक प्रकार आहे, असे स्पष्टीकरण मंदा म्हात्रे यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com