शहापुरात कडक उन्हात कार्यकर्त्यांचा प्रचार;

शहापुरात कडक उन्हात कार्यकर्त्यांचा प्रचार;

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा
खर्डी, ता. ११ : भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. त्यातच दिवसागणिक उष्णतेचा पारा वाढत असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांना शहापूर विधानसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यात प्रचार करताना कडक उन्हाच्या काहिलीचा सामना करावा लागत आहे. यात कार्यकर्त्यांची मात्र अधिक दमछाक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर दुसरीकडे सर्वपक्षीय पदाधिकारी शहापुरातील गावागावांत, बूथमध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या वातानुकूलित चारचाकी वाहनांमधून गावोगावी पोहचत आहेत. मात्र, वाहनांमधून उतरताच त्यांचीही दमछाक होत आहे. एकंदरीत सर्वपक्षीय पदाधिकारी या उन्हाच्या काहिलीने घामाघूम झाल्याचे दिसत आहे.

भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघातही उमेदवाराने ये-जा करण्यासाठी कार्यकर्त्यांना वाहने उपलब्ध करून दिली आहेत. अल्पोपहार आणि पाणी-जेवणाच्या व्यवस्थेमुळे एकनिष्ठ कार्यकर्ते उन्हाचा ४२ ते ४३ अंश सेल्सिअस पारा असताना अतिदुर्गम भागातील घराघरांत पोहचून आपल्या उमेदवारांची बाजू सांगून प्रचार करत आहेत. सध्या सावलीच्या ठिकाणी, झाडाखाली आणि चौकात कॉर्नर सभा घेण्यात येत आहेत. मेळावेही लॉन्स आणि लग्न समारंभ सभागृहात घेण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शहापूर, वासिंद, खर्डी, कसारा, किन्हवली या मोठ्या गावांत उमेदवार मुख्य रस्त्याने गाडीत बसून रॅलीद्वारे हात दाखवत मतदारांच्या भेटी न घेताच जात असल्याने मतदार संभ्रमात पडले आहेत. उमेदवार घरोघरी जात नसल्यानेही काही मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वच उमेदवार समाज माध्यमांद्वारे आपला प्रचार करताना दिसून येत आहे. मतदार या प्रचाराने हैराण झाले आहे.

आरोप-प्रत्यारोपांवर मतदारांची नाराजी
मतदारांना सध्या पाणी टंचाई, शैक्षणिक धोरण, बेरोजगारी, शासकीय प्रकल्प, आरोग्य व्यवस्था या समस्या सोडवण्यासाठी उमेदवार काय करणार? या अपेक्षा आहेत. विकासाच्या कुठल्याच मुद्द्यावर एकही उमेदवार बोलत नसल्याने मतदार वैयक्तिक आरोप -प्रत्यारोप एकूण हैराण झाले आहेत. येथील ग्रामीण भागातील मतदारांना रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न पडला असून, तो सोडवण्यासाठी उमेदवार काय योजना आणतो, याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com