वीर वाजेकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

वीर वाजेकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

वीर वाजेकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
उरण, ता. ११ (वार्ताहर) : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकतेच फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उत्‍साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कीर्तनकार एकनाथ पाटील, लेखापाल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान दुसरे कुठलेच नाही. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले एकनाथ पाटील यांनी आध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून माणसाला जगता यायला हवे. शिक्षकाने आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करायला हवे. विद्यार्थ्यांना उद्देशून, शिक्षणाने माणूस केवळ साक्षर होतो, असे नाही तर तो सज्ञान होणे गरजेचे आहे. जगातील प्रत्येक गोष्टीवर कर आकारला जातो, फक्त विद्यादानावर कसलाही कर आकारला जात नाही. विद्या ही दिल्याने वाढते. पैसा मिळवणे हा शिक्षणाचा हेतू नसावा, तर शिक्षणाने आयुष्य चांगले बनते, असे मत आपल्या मार्गदर्शनातून मांडले. प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाचा गोषवारा मांडून आजच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, व्यवसाय, उद्योग तसेच स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे, असे नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांसमोर खूप संधी आहेत. त्याचा त्याने फायदा केला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात सहकार्य करणे गरजेचे आहे. महामुंबईच्या जवळ असणाऱ्या महाविद्यालयात तुम्ही शिकत आहात, शिकून बाहेर पडला तरी तुमचे आणि महाविद्यालयाचे नाते कायम राहिले पाहिजे. उद्योगनगरीच्या जवळ असणाऱ्या तुम्हा विद्यार्थ्यांना खूप संधी खुणावत आहेत, असे यावेळी पवार यांनी सांगितले.
............
वृद्धाश्रमातील स्वच्छतागृहासाठी साहित्य भेट
खारघर, ता. ११ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनच्या वतीने कळंबोली येथील गोल्डन नेस्ट फाऊंडेशन वृद्धाश्रमातील स्वच्छतागृहासाठी लागणाऱ्या वस्तूंची भेट देण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी रवी किरण, शैलेश पटेल, अनुप गुप्ता, संजय गुप्ता, कमलेश अगरवाल, मनमीत कौर आदी उपस्थित होते. या वृद्धाश्रमात पंधरा वृद्ध राहत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दहा महिन्यांपासून रोटरी क्लबकडून स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.
.......................
रोटरी क्लब कळंबोलीचा वेगळा उपक्रम
कळंबोली, ता. ११ (बातमीदार) : कळंबोलीतील सेक्टर १४ मध्ये असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर व पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थिनींना रोटरी क्लब कळंबोलीच्या वतीने सॅनिटरी पॅड मशीन भेट म्हणून देण्यात आली. विद्यालयाला देण्यात आलेल्या भेटवस्तूंमुळे शाळेकडून आभार व्‍यक्‍त करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष साधना भगत, सचिव प्रसाद पाटील, तसेच क्लबचे सभासद जी. एस. पाटील, मोरेश्वर चौधरी, नाना कांडपिळे, दीपक अमृतकर उपस्थित होते.
............
अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : शहरात विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घणसोली रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहनांकडून अवैधरीत्या वाहतूक केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होत असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. घणसोली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला ठाणे- बेलापूर मार्गावर खासगी वाहनचालकांकडून घणसोली रेल्वे स्थानक ते लोधा, पलावा आदी ठिकाणी शेअर वाहतूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्‍यावर कोणाचेही बंधन नाही. त्यामुळे वाशी, डोंबिवली, कल्याण- बदलापूरकडे जाणाऱ्या पालिका परिवहन उपक्रमाच्‍या गाड्यांना दैनंदिन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. विशेष म्‍हणजे, या अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये अनेक वेळा चोरी, महिलांशी गैरवर्तन आदी प्रकार घडले आहेत. याप्रकरणी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना विचारले असता, त्‍यांनी घणसोली येथील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com