पालघरमध्ये महायुती अडचणीत

पालघरमध्ये महायुती अडचणीत

मोखाडा, ता. १० ः पालघर लोकसभेत शिवसेनेत असलेल्या राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला भाजप जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. त्यांनाच आता भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला आहे; तर शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदर आंदोलकांना दलाल म्हणून संबोधल्याने बंदरपट्टी भागात असंतोष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच अंतर्गत घडामोडीमुळे पालघरमध्ये महायुती अडचणीत आली आहे.
देशात ४००, तर राज्यात ४५ पारचे लक्ष्य ठेवत महायुतीने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला आहे. येथे भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देत बहुजन विकास आणि महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे पालघरची लढत तिरंगी बनली आहे. दरम्यान, प्रचाराच्या याच धामधुमीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला आहे. ज्या गावितांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला, त्यांनाच पक्षात सन्मानाने प्रवेश दिला गेल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तोंडघशी पडले आहेत; तर दुसरीकडे सवरांच्या प्रचार सभेत शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधासाठी स्थापन केलेल्या संघर्ष कृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना दलाल म्हणून संबोधले आहे. त्यामुळे निकम यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही घटनांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता अधिक आहे.
------------------------------
गेल्या पंचवीस वर्षांपासून कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय वाढवण बंदरविरोधी संघर्ष कृती समिती बंदर उभारणीला विरोध करत आहे. निकम हे आमच्याच मतांवर बंदरपट्टी भागातून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- नारायण पाटील, अध्यक्ष, वाढवण बंदरविरोधी संघर्ष कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com