शिवसेना ठाकरे गटाची बीकेसी मैदानासाठी चाचपणी

शिवसेना ठाकरे गटाची बीकेसी मैदानासाठी चाचपणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र मनसेला शिवाजी पार्क येथे महायुतीच्या समारोप सभेसाठी पालिका आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याची परवानगीही मिळाली आहे. येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या उपस्थित ही सभा होणार आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गट बीकेसी मैदानासाठी चाचपणी करीत असल्याचे समजते. ठाकरे गटानेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता.

मुंबईत अजूनही मोठ्या प्रचार सभा सुरू झालेल्या नाहीत. राज्यात अन्यत्र मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. आता सर्व राजकीय पक्ष मुंबईकडे आपले लक्ष वळवत आहेत. त्यासाठी मुंबईतील मध्यवर्ती जागा सभेसाठी शोधण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान मोदी हे १७ मे रोजी मुंबईत येत आहेत. मुंबईतील मतदानाला फक्त १० दिवस शिल्लक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता पुढील आठ दिवस राजकीय सभांनी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मुंबईत महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे मनसेने १८ मार्च रोजी रीतसर अर्ज केला होता. त्याचदरम्यान ठाकरे गटानेही १८ मेच्या सभेसाठी जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता. पालिकेच्या जी उत्तर विभागाने दोघांचे अर्ज नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मनसेला परवानगी देण्याबाबत ८ मे रोजी नगर विकास विभागाने पालिकेला कळवले. त्यानंतर ९ मे गुरुवारी पालिकेच्या जी उत्तर विभागाने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे.


..
ठाकरे गटाचा ‘एमएमआरडीए’कडे अर्ज
शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे ३९ दिवस व राज्य सरकारकडे सहा दिवस परवानगीचे अधिकार आहेत. सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन ही परवानगी दिली असल्याची माहिती मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच बीकेसीसाठी ‘एमएमआरडीए’कडे अर्ज सादर केला आहे. महाविकास आघाडीची समारोप सभा १७ मे रोजी बीकेसी मैदानात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दिली आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com