खारघरमध्ये मतदार यादीत सावळागोंधळ

खारघरमध्ये मतदार यादीत सावळागोंधळ

खारघरमध्ये मतदार यादीत सावळागोंधळ
एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रावर; दीड ते दोन किमीची होणार पायपीट
खारघर, ता. ११ (बातमीदार) : खारघरमध्ये मतदार यादीत सावळागोंधळ असून एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्राला जोडण्यात आली आहेत, तर काहींचे नाव यादीत नसल्यामुळे मतदार वर्गात नाराजी पसरली आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पनवेल महापालिका गेल्या महिनाभरापासून जनजागृती करीत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराला घराजवळ मतदान केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र खारघर वसाहतीत ग्रामपंचायत काळापासून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये अद्यापही सुधारणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे खारघर हे पनवेल मतदारसंघातील सर्वात जास्त मतदारसंख्या असलेली वसाहत आहे. या वसाहतीत सेक्टरनिहाय इमारती असताना, मतदार याद्यांमध्ये खालची आळी, वरची आळी, मधली आळी असे दर्शविण्यात आले आहे. परिसरात सेक्टरनिहाय शाळेत मतदान केंद्र आहे. मात्र मतदारांची नावे दुसऱ्या मतदार केंद्रांत जोडण्यात आली आहेत. सेक्टर ११ केंद्रीय विहार सोसायटीमधील बहुतांश मतदारांना कोपरा गावात, तर कोपरा गावातील बहुतांश मतदारांना सेक्टर आठमधील रेड क्लिप शाळेत मतदानासाठी जावे लागणार आहे. अशीच अवस्था बेलपाडा, मुर्बी आणि खारघर वसाहतीमधील मतदारांची झाली आहे. मतदारांना मतदानासाठी जाताना एक ते दोन दीड किलोमीटर अंतर पार करून मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे. तसेच एकाच घरात आणि इमारतीत वास्तव्य करणाऱ्या मतदारांची नावे विविध मतदान केंद्राला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार वर्गात नाराजी पसरली आहे.
......................
९८ केंदांवर मतदान
-निवडणूक विभागाने खारघर वसाहतीत ९८ मतदान केंद्रे उभारली आहेत. जिल्हा परिषद, समाज मंदिर आणि खासगी शाळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे काही शाळेत दहा मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांनी आपले केंद्र क्रमांकाची माहिती असणे आवश्यक आहे. खारघर वसाहत हे पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मतदार संख्या असलेली वसाहत आहे. वसाहतीत जवळपास सव्वा लाख मतदार असून कोपरा, रेड क्लिप, बेलपाडा, भारती विद्यापीठ, बालभारती, गोखले, रियॉन इंटर नॅशनल, ग्रीन फिंगर, अपीजय, मुर्बी, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, मुर्बी, ओवे, पेठगाव अशा जिल्हा परिषद आणि खासगी शाळांत निवडणूक विभागाने ९८ मतदान केंद्रे उभारली आहेत.
.....................
खारघर सेक्टर १८ मधील एकाच कुटुंबात वास्तव्य करणाऱ्या तीन मतदारांपैकी एकाचे नाव तळोजा वसाहतीमधील मतदान केंद्र, तर दोघांची नावे सेक्टर २० मधील मतदान केंद्रांत जोडण्यात आली आहेत. मुर्बी गावातील शाळेत मतदान केंद्र असताना, काही मतदारांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रात जोडण्यात आली आहेत.
- मनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते.
...................
मतदार ऑनलाईन नावांचा शोध घेत असावेत, इंग्रजी आणि मराठी नावांत थोडेफार बदल असल्यामुळे ऑनलाईन दिसत नसावे. त्यामुळे मतदार वर्गात संभ्रम निर्माण झाला असावा. त्यांनी मतदार यादीत शोध घ्यावे. कोणत्‍याही मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत.
- संजय भालेराव, नायब तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, पनवेल
....................
- महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांनी आपले नाव घरबसल्या कशा पद्धतीने शोध घ्यावा या विषयी लिंक उपलब्ध करून दिली जात आहे. त्‍यामुळे मतदारांना घरबसल्या कोणत्या केंद्रावर मतदान आहे. याची माहिती उपलब्ध होत असल्यामुळे मतदार समाधान व्यक्त करीत आहेत.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com