‘खारफुटी बचाव’चा पक्षांच्या जाहीरनाम्यात उल्लेख हवा

‘खारफुटी बचाव’चा पक्षांच्या जाहीरनाम्यात उल्लेख हवा

-झोरू बाथेना, पर्यावरणवादी
मुंबई हे समुद्राने वेढलेले शहर आहे. याला आपण बेट म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहराच्या चारही बाजूंनी समुद्र आणि खाडीकिनारा असल्याने खारफुटींचे घनदाट जंगल दिसते. खारफुटींचे हे जंगल आज जेवढे दिसते त्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते. ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे; पण याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष दिसत नाही. एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात याबाबतचा उल्लेख नाही, ही खेदाची बाब आहे.
मुंबईतील खारफुटींची अवस्था फार चांगली आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे वाढत असलेले अतिक्रमण हे आहे. खाडीकिनाऱ्यांवर अवैध भराव टाकून भूखंड तयार करून त्यावर झोपड्या बांधल्या जातात. हे काम रातोरात केले जाते. आज मुंबईत खारफुटी शोधावी लागते, हे दुर्दैवी आहे. या सर्व प्रकारात आपण अजाणतेपणी निसर्गाचे न भरून निघणारे नुकसान करत आहोत. भविष्यात याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे. त्यामुळे वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पक्षांनी या विषयाला प्राधान्य दिले पाहिजे.
सरकारकडून खारफुटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या २०१७ सालच्या अहवालानुसार देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौरस किलोमीटरएवढी वाढ झाली. यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा ८२ चौरस किलोमीटर एवढा असल्याचा दावा सरकारने केला आहे. राज्यातील ठाणे (३१), रायगड (२९), मुंबई उपनगर (१६), सिंधुदुर्ग (५), रत्नागिरी (१) आणि मुंबई शहर (०) या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. राज्यातील खारफुटी जंगल ८२ चौरस कि.मी. इतके आहे.
…..
त्सुनामी रोखण्याची ताकद
जगभरातील काही देशांना त्सुनामीचा फटका बसल्यानंतर खारफुटीचे महत्त्व समोर आले. त्यानंतर जगभरात खारफुटी वाचवण्याची मोहीम सुरू झाली. त्या तुलनेत आपल्याकडे फारशी जागृती होत असल्याचे दिसत नाही. मुंबई शहर हे समुद्राने वेढलेले असल्याने त्यालाही भविष्यात त्सुनामीचा धोका नाकारता येत नाही. त्यावेळी संरक्षणासाठी खारफुटींची गरज भासणार आहे, आपण हे लक्षातच घेत नाही.  

मत्स्य क्षेत्रास महत्त्वाचे...
काही वर्षांपूर्वी या खारफुटीची मोठ्या प्रमाणात तोड सुरू होती. यामुळे किनारपट्टीची धूप होण्याबरोबरच सागरी पर्यावरणावर भीतीची छाया होती. खारफुटीची मुळे ही माशांच्या प्रजननाची केंद्र मानली जातात; मात्र या झाडांच्या तोडीमुळे मत्स्य प्रजननही अडचणीत येण्याची भीती आहे.
बहुसंख्य मासे अंडी घालण्यासाठी या खारफुटीच्या क्षेत्रात येतात. खारफुटीच्या मुळाशी हे मासे अंडी घालतात. खेकडे, कासव, शिंपले यांचे वास्तव्यही या काळात या क्षेत्रात असते. त्यांना अन्न आणि लपण्याची चांगली जागा तेथे मिळते; मात्र ही जंगले नष्ट होत असल्याने मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.
...........
खारफुटी संवर्धनासाठी अनेक पर्यावरणवादी प्रयत्न करत आहेत. त्याला सरकारच्या प्रयत्नांची जोड हवी आहे. मात्र, वन विभागाकडून फारसे सक्रिय प्रयत्न झाल्याचे चित्र नाही. खारफुटींचे महत्त्व बिंबवणारे जनजागृतीपर कार्यक्रम जास्तीत जास्त राबवणे गरजेचे आहे.
-झोरू बाथेना, पर्यावरणवादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com