गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) : हातभट्टी गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. उत्तन- भाईंदर रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चारचाकी गाडीतून पोलिसांनी ५२० लिटर गावठी दारू, चारचाकी गाडी असा एकूण पाच लाख ५२ हजार रुपयांचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरा- भाईंदर विभागाचे दुय्यम निरीक्षक रत्नाकर शिंदे यांना उत्तन- भाईंदर रस्त्यावरून हातभट्टी गावठी दारूची
बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शनिवार (ता. ११) या मार्गावर आपल्या पथकासह पाळत ठेवली असताना (एमएच ४३ बीपी ९८४१) ही चारचाकी गाडी संशयास्पदरीत्या रस्त्यावरून जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीचालकाने ती सुसाट पळवली. हे पाहून तयारीत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनीही त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. भर दिवसा येथील रस्त्यावर हा पाठलाग सुरू होता.

एखाद्या ॲक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे सुरू असलेला हा पाठलाग लोकांनाही आश्चर्यचकित करणारा होता. काही अंतरावर पोलिसांनी दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीला एका अरुंद रस्त्यात अडवले आणि गाडी चालवणाऱ्याला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिकीत ५२० लिटर गावठी दारू आढळून आली. आयुक्त विजय सूर्यवंशी, संयुक्त आयुक्त सुनील चव्हाण, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप परब यांच्या आदेशाने आणि अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पाठलाग करताना पळून गेलेल्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे राम पंडित आडे (३४, राहणार भिवंडी) आणि फैसल सलीम शेख (२२, भिवंडी) अशी आहेत. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचे दुय्यम निरीक्षक रत्नाकर शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com