एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून होणार कार्यान्वित

एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून होणार कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय असावा, यासाठी महापालिका, पोलिस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचेच मूल्यांकन होईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. ९) सायंकाळी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे केले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसीलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, एमआयडीसी, एमएमआरडीए, एसटी महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायन्स क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली. तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केली.

प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत
पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे. या वेळेचा उपयोग करून सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढावा, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली. आपत्तीच्या काळात अफवा पसरवल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ त्याचे खंडन करून वस्तूस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी बल्क एसएमएस, समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांची मदत घ्यावी, असेही राव यांनी सांगितले. एकत्रित नियंत्रण कक्षात पालिका, पोलिस, महावितरण यांचे प्रतिनिधी २४ तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील. त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणे सोपे होईल, असेही राव यांनी सांगितले. क्षेत्रात असलेले महापालिका आणि पोलिसांचे १,६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे कार्यरत राहील, त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल, यासाठी स्वतंत्र पथक तयार असेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

रेल्वे मार्गावरील पुलाची दुरुस्ती
कोपरी येथे रेल्वेमार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी परवानगी दिल्यास या दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत करण्यात येईल, असेही राव यांनी सांगितले.

भंगार, बेवारस वाहनांच्या विरोधात मोहीम
रस्त्यावर असलेली बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. ही वाहने ठेवण्यासाठी जागा शासनाकडून उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रहदारीला असलेले अडथळे दूर होतील. पुढील १५ दिवसांत ही मोहीम व्हावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com