युती, आघाडीच्या गावोगावी बैठका

युती, आघाडीच्या गावोगावी बैठका

मोखाडा, ता. १२ (बातमीदार) : पालघर लोकसभेच्या उमेदवारांनी जास्त मतदार संख्या असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचाराची धुरा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या भागात पदाधिकारी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मात्र, उन्हाची काहिली आणि खरीपाचे मान्सूनपूर्व शेतीच्या कामासाठी शेतकरी, शेतमजूर शेतावर; तसेच जंगलात जात आहे. त्यामुळे गाव-पाड्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. मतदारांना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गण आणि गटनिहाय गावपाड्यांत बैठका घेणे सुरू केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण मतदारसंघात, उमेदवारांना गावागावांत पोहोचणे शक्य होत नाही. प्रचारासाठी कमी दिवस मिळाल्याने उमेदवारांनी जास्त मतदार संख्या असलेल्या शहरी क्षेत्रात लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ग्रामीण प्रचाराचा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांभाळला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराची रणनीती आखत गावोगावी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मात्र, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेले नागरिक गाव सोडून जंगलाचा सहारा घेत आहेत. तर शेतकरी आणि शेतमजूर मान्सूनपूर्व खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीला लागले आहे. त्यामुळे गावपाड्यांत शुकशुकाट दिसून येत आहे. यावर नामी शक्कल लढवत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. बैठकीदरम्यान चौक सभा, काॅर्नर सभाही घेतल्या जात आहेत. या सभांना जिल्ह्याचे पदाधिकारी, तसेच आमदार हजेरी लावत आहेत. या सभांमधून आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे, तसेच उमेदवाराची ओळख करून देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे गाव-पाड्यांतील वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार सांभाळताहेत धुरा
महायुतीचे उमेदवार डाॅ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी आमदार संजय केळकर यांनी मोखाड्यात हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच प्रचाराचा आढावा घेतला आहे. तर महाविकास आघाडीच्या धुरा आमदार सुनील भुसारा सांभाळत आहेत.

मतांच्या जाेगव्यासाठी कार्यकर्ते बाजारपेठेत
प्रचाराचे शेवटचे अवघे पाच दिवस उरले आहेत. अंतिम टप्प्यात मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. ग्रामीण भागात आठवडे बाजाराची संधी साधून ध्वनिक्षेपकावरून प्रचाराचा गाजावाजा केला जात आहे. त्यामुळे गावपाड्यांत न भेटलेल्या मतदारांना आठवडे बाजारात गाठून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्ते करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com