रिंगणातील ३४ उमेदवार दहावी नापास

रिंगणातील ३४ उमेदवार दहावी नापास

नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राजकारण आणि शिक्षण यांचा तसा फारसा संबंध येत नाही. अगदी अल्पशिक्षित असणाऱ्या नेत्यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी शिक्षित असावा, असा मतदारांचा आग्रह असतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात केवळ पाच उच्च शिक्षित असून ३४ उमेदवार हे दहावी किंवा त्याहून कमी शिकलेले आहेत.
मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या शिक्षणाचा धांडोळा घेतला असता सहा मतदारसंघातील ५४ उमेदवारांनी पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहे. तर ३४ उमेदवार हे दहावी किंवा त्याहून कमी शिकलेले आहेत. तसेच एक उमेदवार अशिक्षित आहे.
दक्षिण मुंबईतील महाआघाडीचे उमेदवार अरविंद सावंत हे पदवीधर आहेत; तर त्यांच्याविरोधात असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव याही पदवीधर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत महायुतीचे राहुल शेवाळे यांनी अभियांत्रिकी पदविका घेतली असून अनिल देसाई यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात महायुतीचे पियूष गोयल हे उच्च शिक्षित असून महाआघाडीचे भूषण पाटील हे पदवीधर आहेत. उत्तर मध्य मुंबईत महाआघाडीच्या वर्षा गायकवाड या पदवीधर आहेत तर महायुतीचे उज्ज्वल निकम यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
उत्तर पूर्व मुंबईत महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील हे पदवीधर असून युतीचे मिहीर कोटेचा यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील आघाडीचे अमोल कीर्तिकर यांची बारावी झालेली आहे तर युतीचे रवींद्र वायकर हे पदवीधर आहेत.
--
उज्ज्वल निकम यांचा सहा वकिलांशी सामना
एकूण पदव्युत्तर आणि पदवीधर उमेदवारांमध्ये विधी विषयांतील सर्वाधिक उमेदवार आहेत. १०६ उमेदवारांमध्ये २० हून अधिक उमेदवारांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढत असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात निकम यांच्यासह अन्य सहा वकील आपले नशीब आजमावत असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
---
उच्च शिक्षितांकडून पुढाकारच नाही
उच्च शिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवार उच्च शिक्षित आहेत. त्यातील एक भाजप तर अन्य चार अपक्ष आहेत.
---
एक उमेदवार सात पदवीप्राप्त
दक्षिण मध्य मुंबईतील अपक्ष उमेदवार डॉ. अरुण मुरूडकर यांच्याकडे सर्वाधिक सात पदव्या आहेत. यामध्ये बीए, एमए, एलएलबी, एलएलएम, पीएचडी, डी.लीट, एलएलडी या पदव्यांचा समावेश आहे. तर उत्तर पूर्व मुंबईतील अपक्ष उमेदवार प्रो. डॉ. प्रशांत गंगावणे यांनी पीएचडी, एमटेक, बीटेक आणि एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे. याच मतदारसंघातील डॉ. सुषमा मौर्या यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून समाजसेवा विषयात डॉक्टरेट मिळवली आहे.
---
नाव समान; पण शिक्षणाचे काय?
निवडणुकीत समोरच्या उमेदवाराचे मत विभाजन व्हावे, यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून समान नाव असलेले उमेदवार दिले जातात. दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी साधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीच्या अरविंद गणपत सावंत यांच्याविरोधात अरविंद नारायण सावंत हे उभे आहेत. खासदार अरविंद सावंत यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे, तर अपक्ष अरविंद सावंत हे दहावीपर्यंत शिकलेले आहेत.
उत्तर मध्य मुंबईत आघाडीकडून वर्षा गायकवाड (पदवी) तर अपक्ष दोन वर्षा गायकवाड रिंगणात होत्या. यातील एक पाचवी पास तर एक बारावी पास; पण त्या दोघींचे अर्ज बाद झाल्याने मतविभाजन टळले आहे.
उत्तर पूर्व मुंबईत आघाडीच्या संजय दिना पाटील यांच्याविरोधात अन्य चार संजय पाटील उभे होते. त्यातील दोन अर्ज बाद झाले. मात्र, आता तीन संजय पाटील रिंगणात आहेत. यामध्ये आघाडीचे संजय दिना पाटील यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर अपक्ष संजय पाटील नववी आणि संजय बी. पाटील पाचवी पास आहेत.
----
उमेदवारांचे शिक्षण
उच्च शिक्षित : ५
पदव्युत्तर : २७
पदवी : २२
बारावी : १७
दहावी : १३
दहावीपेक्षा कमी : २१
अशिक्षित : १
-----
मुंबईतील उमेदवार
महिला : १५
पुरुष : ९१
उमेदवार : १०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com