विवाहितेच्या आत्महत्येबाबत नातेवाईकांचा संशय

विवाहितेच्या आत्महत्येबाबत नातेवाईकांचा संशय

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : खारघर, सेक्टर ३५ एफ भागात राहणाऱ्या अर्चना सिंह (वय ३१) या विवाहितेने ३ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती; मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा पती अमोधप्रकाश सिंह (वय ३७) याने तिची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आरोप मृत अर्चनाचे वडील अशोककुमार सिंह यांनी केला आहे. याप्रकरणी अर्चनाच्या पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे अशोककुमार यांनी सांगितले.
खारघरमधील इनोव्हेटिव्ह हाईट्स इमारतीत पती व दोन मुलांसह राहणाऱ्या अर्चना सिंह या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर खारघर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. अर्चनाचा पती अमोधप्रकाश सिंह याने गेल्या काही वर्षांपासून अर्चनाचा छळ केला होता, त्यातूनच तिची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा गंभीर आरोप अर्चनाचे वडील अशोककुमार व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अर्चनाचा भाऊ अमनकुमार सिंह यानेही पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी अमोधप्रकाश याच्यासोबत संगनमत करून अर्चनाचे परस्पर शवविच्छेदन करून आपल्याला शवविच्छेदनचा अहवाल दिला नसल्याचे म्हटले आहे. खारघर पोलिसांनी अमोधप्रकाशच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही अमनकुमारने केला आहे.

-------------
दबाव आणल्यानंतर गुन्हा दाखल
एका राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यानंतर व अर्चनाच्या वडिलांनी पोलिसांना धारेवर धरल्यानंतर अमोधकुमारच्या विरोधात आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अमोधप्रकाशला सहकार्य करणाऱ्या सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेणार असल्याचे अर्चनाचे वडील अशोककुमार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com