उमेदवारांचा ‘प्रचारवार’

उमेदवारांचा ‘प्रचारवार’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : अपेक्षेप्रमाणे आजचा रविवार उमेदवारांसाठी ‘प्रचारवार’ ठरला. ठाणे लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद ठरला नसला, तरी महाविकास आणि महायुती उमेदवारांच्या मिरवणुका दोन वेळा एकमेकांसमोर ‘भिडल्या’ने काही काळ वातावरण नक्कीच तंग झाले. आपआपली ताकद दाखवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीतून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. या शक्तिप्रदर्शनाचे रूपांतर राड्यात होण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे तूर्तासतरी मोठा संघर्ष टळला आहे.
मतदानाआधी प्रचारासाठी मिळालेला एकमेव रविवार सार्थकी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार सकाळपासूनच प्रचार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कल्याणमध्ये महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची रॅली झाली. भिवंडीचे महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनीही गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला. तर ठाण्यातही महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी सकाळपासूनच शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र, या प्रचार मिरवणुका एकदा नव्हे तर दोन वेळा समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.
शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची मिरवणूक लोकमान्यनगरवरून वर्तकनगर नाका येथे पोहचली. त्याचवेळी ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांची रॅली वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या दिशेकडून वर्तकनगर नाक्यावर आली. एकमेकांसमोर मिरवणुका येताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीतच दोन्ही मिरवणुकांनी आपला पुढचा रस्ता धरला. त्यानंतर भीमनगरला पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. या वेळीही त्यांनी घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मात्र दोन्ही गटांचे उमेदवार हजर नव्हते. अन्यथा, कार्यकर्त्यांच्या ‘उत्साहाचे’ रूपांतर राड्यात होण्याची शक्यता होती. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

म्हस्केंसाठी मुख्यमंत्री रस्त्यावर
ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले असल्याचे दिसते. रोज ते नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीसाठी संपूर्ण ठाण्यात फिरत आहेत. रविवारीही त्यांनी नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीत हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com