डहाणू, वसई-विरारकरांसाठी
रेल्वेच्या सुविधा वाढवाव्यात

डहाणू, वसई-विरारकरांसाठी रेल्वेच्या सुविधा वाढवाव्यात

मतदाराच्या अपेक्षा
====================

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १३ : मुंबईपासून वसई, विरार ते थेट डहाणूपर्यंतच्या प्रवास करणाऱ्यांना दळणवळणाचे दोनच मार्ग उपलब्ध आहेत. येथील प्रवाशांचा पूर्ण भार हा रेल्वेवर असतो. त्याच्या जोडीला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असला, तरी त्यावर होणारी वाहतूक कोंडी हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पश्चिम रेल्वे ही येथील प्रवाशाची एक प्रकारे जीवनदायिनी असल्याचे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी येथील डहाणू, वसई-विरारकरांसाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नोकरदार वर्ग आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
डहाणू ते विरार आणि डहाणू ते थेट मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची सातत्याने मागणी होत आहे; परंतु त्या वाढवण्यास असमर्थ असल्याचे एका बाजूला रेल्वे सांगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र लांब पल्ल्याचे गाड्यासाठी ट्रॅक मोकळे केले जात आहेत. पालघर पट्ट्यात कोकणातील अनेक जण वास्तव्यास असल्याने त्यांना गावी जाण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वसईतून गाड्यांची सुविधा असावी. प्रत्येक जिल्ह्यात एक टर्मिनल आहे; मात्र पालघर जिल्ह्यात एकही रेल्वे स्थानक टर्मिनल नाही. त्यामुळे वसई रोड रेल्वे स्थानकाला टर्मिनल बनवावे. या ठिकाणी प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा; विशेषतः कोकणात जाण्यासाठी गाड्या येथून सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्हा हा तसा शेतीप्रधान जिल्हा आहे. या ठिकाणी भाजीपाला, फुले, दूध याचे उत्पादन होत असते; परंतु रेल्वेच्या डब्यात माल घेऊन जाणे म्हणजे एक दिव्य समजले जात आहे. त्यामुळे उमेदवारांनी या समस्येकडे लक्ष द्यावे आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपाययोजनांसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.


वसई-विरार शहरातून मुंबईच्या दिशेने कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या १० लाखांच्या घरात आहे. रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यासाठी या लोकलच्या फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. पालघरच्या दिशेने जाणाऱ्या फेऱ्याही वाढवणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात एसी लोकलचा प्रवास द्यावा. लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राखीव जागेपर्यंत पोहोचणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा होण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.
- हरेश राऊत, प्रवासी, किरवली

पालघर जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी वसई, अर्नाळा, दातिवरे, माहीम, पालघर, सातपाटी अशा ठिकाणी जेटी उभारून सरकारने रो-रो सेवा सुरू करावी. पालघर या जिल्ह्याच्या केंद्रस्थानी वसईतून जाण्यासाठी योग्य वाहतुकीची सुविधा नाही. वाहतूक कोंडीमुळे रस्त्याने प्रवास कठीण होते. तर रेल्वेचा प्रवासही तितका सोपा राहिलेला नाही. मुंबई, वसई, भाईंदर, मीरा रोडला जायचे असेल, तर सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ११ या दरम्यान प्रवास करणे कठीण असते. इतकी लोकलला गर्दी असते. रेल्वेमार्गाला जोडून एक रस्ता २५ वर्षांत झाला असता, तर रिक्षा, एसटी, टॅक्सी यांना रोजगार मिळाला असता. त्यामुळे आगामी सरकारने येथील दळणवळणाचा प्रश्न मार्गी काढावा.
- दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, नालासोपारा

पालघर, वसई-विरार, डहाणू या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फुलांचे उत्पादन होत असते. पिकवलेला हा माल मुंबईच्या बाजारात नेण्यासाठी रेल्वे हा पर्याय सोईस्कर आहे. परंतु, रेल्वेत चढणे म्हणजे जिकिरीचे काम झाले आहे. माल डब्यातही प्रचंड गर्दी असते. या भागात फुलणाऱ्या फुलांना मुंबईमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने सकाळच्या वेळेत हा माल लोकल नेता येतो. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा.
- सुभाष भट्टे , शेतकरी आणि राज्य फुलशेती पुरस्कार विजेते
=================================================
फोटो
१) दत्तात्रय देशमुख
२) हरेश राऊत
३) सुभाष भट्टे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com