विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशन’

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशन’

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टिकोनातून महापालिका ‘सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशन’ हा उपक्रम राबवणार आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने आगामी शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या एका शाळेत तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमांच्या ३६ शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील हे सर्व विद्यार्थी आहेत. खासगी शाळांमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाचे शिक्षण महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळावे, असा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने मिशन २०४७ या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात शैक्षणिक विषयावरील तज्ज्ञदेखील सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार महापालिकेने शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा शारीरिक विकास व्हावा, त्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशन’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमासंदर्भात आयुक्त संजय काटकर यांनी नुकतीच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सामाजिक संस्था यांच्यांशी चर्चा आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर उपस्थित होते. या उपक्रमात सुमारे सात सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. या संस्था विद्यार्थी, शिक्षक व महापालिका प्रशासन यांच्यात दुवा म्हणून काम करणार आहेत.

२० सुपर शिक्षकांची निवड
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. उपक्रम राबविण्यासाठी संस्थेकडून २० सुपर शिक्षकांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर आगामी शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीन महिन्यांसाठी महापालिकेच्या एका शाळेची निवड केली जाणार आहे. या शाळेत निवड झालेल्या सुपर शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढावी, तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशन’ हा उपक्रम राबवला जाणार आहे.
- संजय काटकर, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com