निवडणुकीमुळे फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस

निवडणुकीमुळे फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस

निवडणुकीमुळे फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
वाढत्या मागणीमुळे फुलांच्या दरात वाढ
ठाणे, ता. १३ (बातमीदार) : संपूर्ण महाराष्ट्रात यंदा कडक उन्हाळा असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पाणीटंचाईमुळे पिकांना भर उन्हाळ्यात पाणी मिळणे मुश्किल झाले आहे; मात्र तरीही यंदा निवडणूक व लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी आहे. कार्यालयांचे उद्‌घाटन, नेत्यांचे स्वागत, सभा आणि नेत्यांच्या स्वागतासाठी फुलांची मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे फुलांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.

प्रत्येक कार्यक्रमाला जाताना बुके किंवा फुलांचा हार घेऊन जाण्याची प्रथा काही नवीन नाही. त्यामुळे दररोज हजारो किलो फुलांची गरज भासते. यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने फुलांची आवकही कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, फुलांच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी गुलाब १०० ते १५० रुपये किलो होता. आता तो २०० रुपये किलो झाला आहे; तर सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध २५० ते ३०० रुपये किलो आहे. फुलांचे दर वाढल्याने बुके आणि हारांचे दरही वाढले आहेत.

बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे चित्र आहे. तसेच झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने झेंडूचेही दर वाढले आहेत. झेंडूच्या आणि विविध फुलांच्या हाराची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यामुळे नेत्यांचे दौरे, रॅली आणि लहान-मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्षांची कार्यालये, शाखा, चौक सभा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा फुलांसोबतच चॉकलेट बुकेलाही पसंती आहे.

आवक जेमतेम; मागणी अधिक
उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते. मात्र, बाजारात फुलांची आवक जेमतेम असून फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे हार आणि बुके यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत.

फुलांचे प्रकार दर (प्रति किलो)
गुलाब - २०० रुपये
निशिगंध - २५० रुपये
मोगरा - ५०० रुपये
जरबेरा - १०० रुपये (१० नग)
डच गुलाब - ४०० रुपये (२० नग)
झेंडू - १०० रुपये

बुके व पुष्पहार दर
बुके - १५० ते २५० रुपये
व्हीआयपी बुके - ४५० ते ७५० रुपये
तुळशी रोप - ६० रुपये
पुष्पहार - ५० ते १,५०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com