आता आग लावण्याची कामे बंद करा

आता आग लावण्याची कामे बंद करा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : समाज इतका मूर्ख राहिलेला नाही. परप्रांतीय आणि मुसलमान बांधवांना टार्गेट करून हिंदू आणि मराठी मत एक होतील, असे वाटत असेल, तर ते होत नाही. त्यामुळे आता आग लावण्याची कामे बंद करा, अशी टीका शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. महायुतीच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मुसलमान आणि परप्रांतीय यांच्या मुद्द्यांना हात घालून जोरदार टीका केली. त्यानंतर, आव्हाड यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे तुमच्या बोलण्याला मर्यादा आहे. तुमचा किती अभ्यास हे मला माहीत नाही. दोन विषय घेऊन तुम्ही अनेक वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आहात. तुमच्या राजकारणाचा आता शेवटच दिसतो, असे उद्‍गार काढत आव्हाड यांनी ठाकरेंना डिवचण्याचे काम केले. काही झाले की हिंदू-मुसलमान मराठी-परप्रांतीय हे बोलून देशात आणि महाराष्ट्रात भांडणे लावायचे का? असाही प्रश्न विचारला. देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे. बेरोजगारी किती, श्रीमंत आणि गरीब कोण झाले; शेती, उद्योग या मुद्द्यांवर कधी बोलणार असा सवाल करत फक्त मुसलमान, परप्रांतीय बोलणार आहात का? आपल्याकडे बाकी काही मुद्दे नाही का? असे आव्हाडांनी राज यांना सुनावले आहे.

महागाईवर बोला!
गॅस, पेट्रोल-डिझेल आदींच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महागाईवर बोला मराठी माणसांची ही अपेक्षा आहे. फक्त मारझोडीचे राजकारण सोडून वाढत्या महागाईवर बोला, असेही आव्हाड यांनी राज ठाकरे यांना सुनावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com