पालिकेकडूनही होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट

पालिकेकडूनही होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे स्थैर्य प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर करण्याचे आदेश कंत्राटदाराला दर वर्षी पावसाळ्याच्या आधी दिले जातात; मात्र सोमवारी (ता. १३) मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील होर्डिंग्जचे महापालिकेच्या अभियंत्यांच्या पॅनलकडूनही स्वतंत्रपणे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या जागेवर कंत्राटदाराच्या माध्यमातून सुमारे १५० होर्डिंग्ज उभारण्यात आली होती, तर खासगी जागांवर ५७ होर्डिंग्ज उभारलेली आहेत. या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून स्थैर्य प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाकडून कंत्राटदाराला दिले जातात. त्यानुसार यावर्षीही तशी पत्रे कंत्राटदाराला देण्यात आली आहेत; मात्र सोमवारी घाटकोपर येथे झालेली भीषण दुर्घटनेची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.

शहरातील होर्डिंग्जच्या सुस्थितीबाबत केवळ कंत्राटदाराने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवर अवलंबून न राहता या सर्व होर्डिंग्जचे महापालिकेकडूनही स्वतंत्रपणे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत महापालिकेच्या जागांवर असलेली जुनी १५० होर्डिंग्ज आधीच काढून टाकण्यात आली असून त्यावर नवीन होर्डिंग्ज उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे केवळ खासगी जागांवर असलेल्या ५७ होर्डिंग्जचेच स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेकडून केले जाणार आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्यासाठी अभियंत्यांचे पॅनल नियुक्त केले आहे. याच पॅनलकडून आता होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे, तसे पत्र महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदाराने केलेल्या ऑडिटचा अहवाल व महापालिकेने केलेल्या ऑडिटचा अहवाल याची पडताळणी केली जाणार आहे व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी येणारा सर्व खर्च संबंधित कंत्राटराकडून वसूल केला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.

न्यायालयात वाद सुरू
महापालिकेच्या जागांवर कंत्राटदाराने उभारलेल्या १५० होर्डिंग्जबाबत न्यायालयात वाद सुरू होता. कंत्राटदाराची मुदत संपल्यामुळे महापालिकेने नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया केली होती व त्यासाठी आधीची १५० होर्डिंग्ज कापून टाकायची मोहीम हाती घेतली होती. मात्र कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतल्याने गेली सहा वर्षे कारवाईवर स्थगिती होती. ही स्थगिती अलिकडेच हटल्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या जाहिरात विभागाने जुनी सर्व १५० होर्डिंग्ज काढून टाकली आहेत.

नवीन होर्डिंग्जची सुटका
आता या जागेवर कंत्राटदाराकडून नवीन होर्डिंग्ज उभारण्याचे काम सुरू असून आतापर्यंत २० होर्डिंग्ज उभारून झाली आहेत. ही सर्व होर्डिंग्ज नवीन असल्याने त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, मात्र खासगी जागेवर असलेल्या ५७ होर्डिंग्जचे महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.

दोन महाकाय होर्डिंग्ज
मुंबईत दुर्घटना झालेले होर्डिंग्ज महाकाय होते. तशाच पद्धतीची दोन होर्डिंग्ज मिरा-भाईंदरच्या परिसरात भाईंदर-ठाणे महामार्गावर उभारण्यात आली आहेत. मात्र या होर्डिंग्जच्या कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली असल्याने महापालिकेला त्यावर कारवाई करणे शक्य झालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com