हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताला २७ वर्षांनी अटकेत

हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताला २७ वर्षांनी अटकेत

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदर पूर्व येथे २७ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी नुकताच पोलिसांच्या हाती लागला आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने ही कामगिरी फत्ते केली आहे.

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील गंभीर व क्लिष्ट स्वरूपांचे, तसेच खुनाच्या गुन्ह्यांतील फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार १९९७ मध्ये भाईंदर पूर्व येथे झालेल्या एक हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा गुन्हे शाखेचे युनिट १ शोध घेत होती. ऑक्टोबर १९९७ मध्ये एम. आय. उद्योगनगर परिसरात गटारात प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा टाकण्यावरून बाचाबाची होऊन धरमनाथ रामशंकर पांडे यांच्या डोक्यात बांबूचा फटका मारून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी एक संशयित आरोपी विजयसिंग श्रीरामचंद्र चौहान याला त्याच वेळी अटक केली होती, मात्र मेवालाल ऊर्फ पन्नालाल मुरत चौहान आणि राजेंद्र रामदुलार हे दोघे फरार झाले होते.

गुन्हे शाखेने या प्रकरणाचा फेर तपास सुरू केला. त्या वेळी फरार आरोपींपैकी मेवालाल ऊर्फ पन्नालाल मुरत चौहान हा सध्या दिल्लीत वास्तव्याला असल्याची माहिती हवालदार पुष्पेंद्र थापा यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक राजू तांबे, हवालदार पुष्पेंद्र थापा व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक दिल्लीला रवाना केले. मेवालाल ऊर्फ पन्नालाल याला दिल्लीमधून ताब्यात घेतले. चौहान याने केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली.
--- ---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com