ठाण्यात कोट्यवधींचा कुष्ठरुग्ण घोटाळा?

ठाण्यात कोट्यवधींचा कुष्ठरुग्ण घोटाळा?

ठाण्यात कोट्यवधींचा कुष्ठरुग्ण घोटाळा?
बोगस संख्या दाखवून लाटले पैसे; सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावे
सकाळ वृतसेवा
ठाणे, ता. १४ : कुष्ठरुग्ण अनुदान वाटपाच्या नावाने ठाणे महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पूर्वेकडे असलेल्या कोपरी विभागात फक्त १०० ते १५० कुष्ठरुग्ण असताना सुमारे ७१० जणांना ठाणे महापालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रुपयांच्या निधीचे वाटप केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. इतकेच नव्हे, तर या लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
ठाण्यातील कोपरीमधील गांधीनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक गोष्ट ही आहे की, या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरुग्ण असताना ७१० कुष्ठरुग्णांच्या नावांचा लाभार्थी म्हणून यादीत समावेश केला आहे.
या प्रकरणात साधारणपणे ३५० जणांची बोगस प्रमाणपत्रे बनवून त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याची माहिती देताना समाजसेवक अजय जेया म्हणाले की, नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पालिकेतील सत्ताधारी गटातील व्यक्तीच्या सूचनेनुसार कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित केले जातात. त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) कर्मचारी असणारी व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवून देते. त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरूपातही घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना २४ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे आता या कामामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप अजय जेया यांनी केला आहे.

शासनाकडे लेखी तक्रार
याप्रकरणी शासनाच्या कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com