कचरा उचलण्यासाठी नव्याने निविदा

कचरा उचलण्यासाठी नव्याने निविदा

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी- निजामपूर शहर महापालिकेच्या आरक्षित जागेवरील साठलेला कचरा उचलण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. याबद्दल ‘सकाळ’मध्ये वृत्त छापून आल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. शहरातील शिवाजीनगर-खडकरोड येथे भिवंडी महापालिकेच्या आरक्षित जागेवर नव्याने भाजीपाला मार्केट बांधणे प्रस्तावित आहे. पालिकेने मार्केटची इमारत न बांधता ही मोकळी जागा कचरा ठेकेदाराला परिसरातील कचरा संकलन करण्यासाठी दिली.
दरम्यान, पालिकेच्या चावींद्रा डम्पिंग ग्राऊंडवर नागरिकांनी काही दिवस आंदोलन करून कचरा टाकण्यास बंदी केल्याने ठेकेदाराने संकलनाच्या जागेवर कचरा साठवला. शहराच्या मध्यवर्ती भागात तात्पुरता साठवलेला कचरा ठेकेदार आर अँड बी इन्फ्रा कंपनी या ठेकेदाराने तेथेच ठेवून त्यामध्ये भर घातली. याबाबत नागरिकांनी आक्षेप घेतला; मात्र पालिका प्रशासनाने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कचरा ठेकेदाराविरोधात पालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या या ठिकाणी सुमारे ४०० ते ५०० डंपर कचरा साठलेला आहे. हा कचराप्रकारे जाळला जात आहे. तर पालिकेच्या आरोग्य विभागाने नवीन ठेकेदाराला येथे कचरा टाकण्यास बंदी केली आहे. तरीदेखील जवळच असलेल्या भाजीपाला मार्केटमधील व्यापारी येथे चोरीछुपे कचरा टाकत आहेत. या मोकळ्या जागेला पालिकेने बंदिस्त न केल्याने नागरिक रिक्षा अथवा मालगाडीतून कचरा आणून टाकत आहेत. हा कचरा उचलण्यासाठी ठेकेदारास वारंवार नोटीस बजावली होती. तरीदेखील ठेकेदाराने पालिकेची कचरा वाहून नेण्याची वाहने पालिकेकडे जमा न करता कचरा या जागेतून काढला नाही. तसेच ठेकेदाराचे बिलदेखील पालिकेकडे जमा आहे. त्यामुळे ठेकेदार आणि पालिका प्रशासन यामध्ये वाद सुरू असून पालिका प्रशासन ठोस फौजदारी का करीत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

खडकरोड- शिवाजीनगर येथे जमा असलेल्या कचऱ्याबाबत तक्रारी वाढल्याने हा कचरा उचलण्यासाठी वेगळा ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया पालिकेमार्फत सुरू आहे. येथील कचरा उचलून तो चावींद्रा येथे डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी नवीन ठेकेदार नेमण्यासाठी प्रस्ताव गेल्या आठवड्यापासून तयार आहे. लवकरच नवीन ठेकेदारामार्फत हा कचरा उचलला जाणार आहे. त्याचा खर्च जुन्या ठेकेदाराच्या बिलातून वजा केला जाणार आहे.
- फैजल तातली, आरोग्य विभागप्रमुख, भिवंडी महानगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com