लाल मिरचीचा ठसका झाला कमी

लाल मिरचीचा ठसका झाला कमी

लाल मिरचीचे दर घसरले

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. वर्षभरासाठी लागणारा लाल मिरचीचा मसाला बनवण्यासाठी आणि मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींची बाजारपेठेत लगबग दिसून येते. मागच्या वर्षी लाल मिरचीचे भाव गगनाला भिडले होते; मात्र यावर्षी लाल मिरचीच्या दरात मोठी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटक, हैदराबाद, गुजरातवरून मिरच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी पावसामुळे मिरच्या भिजल्या होत्या. त्यामुळे मिरच्यांचे दर वाढले होते व यंदा मिरच्यांची आवक जास्त असल्याने भाव कमी झाले आहेत.

उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. याच काळात नवीन मिरची बाजारात येते. लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. यंदा मात्र तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारातून मिरची खरेदी करून ती रखरखत्या उन्हात सुकवून मिरचीचे देठ तोडून ती मिरची दळण्यासाठी बाजारपेठेतील मसाला गिरणीवर नेऊन त्यापासून चवदार असा मसाला बनविण्यात येतो. त्याच मसाल्याचा वापर गृहिणी आपल्या चवदार जेवणामध्ये करत असतात. त्याचबरोबर तेजपत्ता, धणे, वेलची, दालचिनी, मिरी, लवंग, जायफळ, शाही जिरा, दगडफूल, खसखस, हिंग, जिरा इत्यादी साहित्य मसाला बनविण्यासाठी वापरल्यास मसाला अत्यंत चवदार आणि स्वादिष्ट होतो.

खडा मसाल्याचे दर स्थिर असल्याने महिलांना यातही थोडासा दिलासा मिळाला आहे. रोजच्या जेवणात सर्रास मिरची पावडरचा वापर होत असल्याने ग्राहकांनी ढोबळी आणि काश्मिरी मिरचीचा वर्षभरासाठी लागणारा लाल मिरचीचा मसाला बनविण्यासाठी मिरची खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.


मिरचीचे दर
गेल्या वर्षी यंदा
पत्री - २८० रु. २४० रु.
लवंगी - ३०० रु. ३६० रु.
बेडकी - ३८० रु. ३२० रु.
संकेश्वरी - ३२० रु. २८० रु.
काश्मिरी - ८५० रु. ५०० रु.
ढोबळी - ९०० रु. ५५० रु.

वर्षभरात स्वयंपाकासाठी लागणारा लाल मिरचीचा मसाला हा उन्हाळ्यात बनविला जातो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या भावात घट झाल्याने समाधान वाटते.
- नंदा सूर्यवंशी, गृहिणी


अवकाळी पावसामुळे नुकसान
गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यातच अनेक ठिकाणी गोदामात असलेली लाल मिरचीही पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बाजारात लाल मिरचीचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती; मात्र यंदा चांगल्या उत्पादनामुळे आवक वाढल्याने मिरचीचे दर कमी होत आहेत. घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. घाऊकमध्ये दर उतरल्याने किरकोळ बाजारातही दर उतरणीला लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com